गावगाड्याचे वास्तव मांडणाऱ्यांसाठी पुरस्काराचे मोल खूप मोठे
By सचिन धर्मापुरीकर | Published: December 7, 2023 05:24 PM2023-12-07T17:24:49+5:302023-12-07T17:25:35+5:30
लोककवी प्रशांत मोरे : भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्काराचे वितरण.
सचिन धर्मापुरीकर,कोपरगाव : राज्यस्तरीय भि.ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार म्हणजे ३५ वर्षांची महायात्रा आहे. अख्या जगाचा पोशिंदा असलेला आणि आज हवालदिल झालेला शेतकरी-शेतमजूर, नांगरणी, पेरणी, खुरपणी, पशु-पक्षी एकूणच कृषी-संस्कृती आणि गावगाड्याचे वास्तव चित्रण करणाऱ्या कवी, कथाकार आदी साहित्यिकांना दिला जाणाऱ्या या पुरस्काराचे मोल आणि महत्त्व खूप मोठे आहे. असे प्रतिपादन लोककवी प्रा. प्रशांत मोरे यांनी येथे केले. कोपरगाव येथील के. जे. सोमैया महाविद्यालयात भि. ग. रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार वितरण समारंभाचे प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोकराव रोहमारे होते.
अशोकराव रोहमारे म्हणाले की, आजपर्यंत या पुरस्काराने १७० पेक्षा अधिक ग्रामीण नवसाहित्यिकांना या पुरस्काराने गौरविण्यात आलेले आहे. कै. के. बी. रोहमारे यांनी लावलेले हे रोप जपण्याचे काम आम्ही आजतागायत करीत आहोत.
कार्यक्रमास उपस्थित साहित्यिक प्रशांत आंबरे म्हणाले की, के.बी. रोहमारे आणि त्यांचे कर्तुत्व यावर प्रकाश टाकला. पाहुण्यांचे स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. बी. एस. यादव यांनी केले. प्रास्ताविक सहकार्यवाह प्रा. जिभाऊ मोरे यांनी केले. परीक्षकांच्या वतीने प्रा. लक्ष्मण महाडिक, प्राचार्य भीमराव वाकचौरे यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन डॉ. शैलेंद्र बनसोडे व प्रा. वर्षा आहेर यांनी केले.
पूरस्कार प्राप्त साहित्यिक आणि साहित्य :
नागू विरकर यांना हेडाम या ग्रामीण कादंबरीसाठी, गणपत जाधव यांना हावळा या ग्रामीण कथासंग्रहासाठी विभागून, आप्पासाहेब खोत यांना काळीज विकल्याची गोष्ट, मनीषा पाटील हरोलीकर यांना नाती वांझ होताना या ग्रामीण कवितासंग्रहासाठी विभागून, प्रविण पवार यांना भुई आणि बाई या ग्रामीण कवितासंग्रहासाठी विभागून, डॉ.रवींद्र कानडजे यांना शेतकरी जीवनसंघर्ष : ऐतिहासिक परामर्श या ग्रामीण समीक्षेसाठी विभागून, डॉ. मारुती घुगे यांना १९८० पूर्वीची ग्रामीण कविता : प्रेरणा आणि प्रवृत्ती प्रवृत्ती या समीक्षेसाठी विभागून, पुरस्कार देण्यात आला.