साईसमाधी मंदिराची वायुविजन यंत्रणा धोकादायक
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2022 06:30 AM2022-09-19T06:30:12+5:302022-09-19T06:30:54+5:30
नागपूरचे साईभक्त गोपाळराव बुटी यांनी १९१४ ते १९१८ या कालावधीत या वास्तूचे निर्माण केले़
प्रमोद आहेर
लोकमत न्यूज नेटवर्क
शिर्डी (जि. अहमदनगर) : जगभरातील भाविकांचे दु:ख हलके करणाऱ्या साईबाबांच्या समाधी मंदिराच्या छतावर वायुविजन यंत्रणेचा बोजा ठेवला आहे. यामुळे या ऐतिहासिक वास्तूलाच धोका निर्माण झाला आहे.
नागपूरचे साईभक्त गोपाळराव बुटी यांनी १९१४ ते १९१८ या कालावधीत या वास्तूचे निर्माण केले़. बुटीवाडा किंवा समाधी मंदिर म्हणून सुप्रसिद्ध असलेली ही वास्तू जगभरातील भाविकांच्या दृष्टीने परमपवित्र मानली जाते. आत हवा खेळती राहावी यासाठी छतावर वायुविजन यंत्रणेचे युनिट ठेवले आहे. रोज ते सुरू करताना हादरा बसतो, तो वरील मजल्यावरही जाणवतो़. वास्तूच्या दृष्टीने हे धोकादायक आहे. याच्यालगतच असलेल्या साईंच्या प्राचीन द्वारकामाई मंदिरात भाविकांचा वावर असतो. वजन व हादऱ्याने इजा पोहोचू नये म्हणून भाविकांना द्वारकामाईत फोटोपर्यंत सुद्धा जाऊ दिले जात नाही. दुसरीकडे समाधी मंदिरावर मात्र बोजा ठेवला आहे.
समाधी मंदिरावरील बोजाची गंभीर बाब नुकतीच निदर्शनास आली आहे. त्यादृष्टीने उपाययोजना करण्यासाठी संबंधितांना सूचना दिल्या आहेत. लवकरच यावर कार्यवाही होईल. - भाग्यश्री बानायत,
सीईओ, साई संस्थान