काही लोकांकडून सहकार संपविण्याचे काम - डॉ. सुजय विखे
By शिवाजी पवार | Published: September 26, 2023 04:33 PM2023-09-26T16:33:08+5:302023-09-26T16:34:10+5:30
विखे म्हणाले, सध्या विखे पाटील कुटुंबाशी काही ना काही संबंध असणाऱ्या संस्था बंद कशा पडतील यावर काही मंडळी दिवसरात्र काम करत आहेत.
श्रीरामपूर (अहमदनगर) : जिल्ह्यात सध्या काही मंडळी सहकार संपविण्यासाठी काम करत आहेत. मात्र यातून सर्वसामान्य व्यक्ती तसेच शेतकरी संपला जातोय, ही अत्यंत खेदाची बाब आहे, अशी टीका खासदार डॉ.सुजय विखे यांनी केली. श्रीरामपूर येथे मुळा प्रवरा सहकारी वीज संस्थेच्या ५०व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विखे बोलत होते. या सभेच्या अध्यक्षस्थानी प्रशासक शरावसाहेब खेडकर, कार्यकारी संचालक डी. पी.पाटील हे होते.
विखे म्हणाले, सध्या विखे पाटील कुटुंबाशी काही ना काही संबंध असणाऱ्या संस्था बंद कशा पडतील यावर काही मंडळी दिवसरात्र काम करत आहेत. परंतु ते हे विसरत आहे की आमच्या कुटुंबीयांनी त्या जिवंत ठेवल्या. त्यामुळे संस्थेशी निगडित कामगार, मजूर, शेतकरी आणि त्यावर आधारित त्यांचा संसार हा चालला. मात्र या लोकांनी आम्हाला विरोध करण्यासाठी या सर्वांच्या संसारावर पाणी फेरले. केवळ विरोधासाठी राजकारण करून सहकारी संस्था बंद पडण्याचा जो उद्योग काही मंडळी सातत्याने करत आहेत त्यामुळे शेतकरी, कामगार, मजूर आणि त्यांचे कुटुंबीय हे उघड्यावर येत आहेत. ते जे हे पाप करत आहेत त्याची परतफेड त्यांना करावीच लागणार असून हीच जनता त्यांना त्यांची जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही.
मुळा प्रवरा वीज संस्थेचे काम अत्यंत चांगले चालविण्याचा आम्ही प्रयत्न केला. मात्र त्यावरही प्रशासक आणले. यामुळे माझे काय नुकसान झाले नाही. परंतु संस्थेवर आधारित कामगार आणि त्यांच्या कुटुंबाचे मोठे नुकसान झाले. सध्या हे प्रकरण न्याय प्रविष्ट असून न्यायालयात संस्थेचे मतदान कमी करण्यासाठी अनेकजण पुढे आले. मात्र ही संस्था व्यवस्थित चालवून शेतकऱ्यांना , कामगारांना न्याय देण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील प्रयत्नशील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे ही संस्था पुन्हा कशी उभारेल यासाठी प्रयत्न करत आहोत असे खासदार विखे यांनी सांगितले.