संगमनेरात तेल कंपनीच्या गोडावूनमध्ये चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2017 12:37 PM2017-11-09T12:37:04+5:302017-11-09T12:42:34+5:30
गोडावूनचे शटर चोरट्यांनी तोडून आतील २० शेंगदाणा पोते, इलेक्ट्रीक मोटार, इलेक्ट्रीक वजन काटा, संगणक साहित्य, इलेक्ट्रिक बल्ब असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला.
संगमनेर : अकोले नाका परिसरातील श्याम आॅईल इंडस्ट्रिज या कंपनीचे गोडावून फोडून २० शेंगदाण्याचे पोते, एक इलेक्ट्रिक मोटार, एक इलेक्ट्रॉनिक काटा, संगणक साहित्य असा सुमारे ८० हजार रुपयांचा ऐवज चोरुन पोबारा केल्याची घटना बुधवारी रात्री घडली.
अकोले नाका परिसरातील मालपाणी हेल्थ क्लब रस्त्यावर श्याम आॅईल इंडस्ट्रिज ही शेंगदाणा तेल उत्पादन करणारी कंपनी आहे. या कंपनीच्या गोडावूनमध्ये शेंगदाणा तेल निर्मितीसाठी शेंगदाण्याचे पोते साठविलेले होते. तसेच तेथे एक इलेक्ट्रिक मोेटार, एक इलेक्ट्रीक वजन काटा, संगणक असे साहित्य होते. नेहमीप्रमाणे दिवसभराचे काम संपल्यानंतर गोडावून बंद करण्यात आले होते. दरम्यान बुधवारी रात्री चोरट्यांनी गोडावूनच्या गेटवरुन उड्या मारुन आतमध्ये प्रवेश केला. गोडावूनचे शटर चोरट्यांनी तोडून आतील २० शेंगदाणा पोते, इलेक्ट्रीक मोटार, इलेक्ट्रीक वजन काटा, संगणक साहित्य, इलेक्ट्रिक बल्ब असा सुमारे ८० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरला. गोडावनूच्या सुरक्षेसाठी कंपनीच्यावतीने काहीही व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. दरम्यान बुधवारी रात्री गोडावून समोर एक टेम्पो येऊन थांबला होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे. या चोरीबाबतसंगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.