नेप्ती उपबाजारात व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:21+5:302021-07-07T04:26:21+5:30
केडगाव : नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या कांद्याचा लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याची मोठ्या प्रमाणात ...
केडगाव : नगर तालुका बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारमध्ये शेतकऱ्यांनी आणलेल्या कांद्याचा लिलाव झाल्यानंतर व्यापाऱ्यांनी खरेदी केलेल्या कांद्याची मोठ्या प्रमाणात लुटमार होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत आहे. या कांदा चोरीला आळा घालण्यासाठी बाजार समिती प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी कांदा व्यापारी असोसिएशनने केली आहे.
याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार शिकरे यांनी बाजार समिती सभापती अभिलाष घिगे यांना निवेदन दिले. नेप्ती उपबाजार समितीमध्ये अहमदनगर माथाडी बोर्ड, हमाल पंचायत तसेच बाजार समितीचे परवानाधारक सभासद काम करत आहे. नेप्ती उपबाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत असल्याने शेतकरी मालाचा लिलाव झाल्यानंतर लिलावासाठी सोडण्यात आलेल्या कांद्याच्या गोण्या भरण्याचे काम महिला कामगार करतात. महिला कामगार नेप्ती उपबाजार समितीमध्ये प्रवेश करत असताना आपल्या बरोबर मोकळ्या पिशव्या घेऊन येतात व काम संपल्यानंतर परत जाताना आपल्या बरोबर आणलेल्या पिशव्यांमध्ये कांदे भरून घेऊन जातात. अशा प्रकारे खरेदीदारांनी खरेदी केलेल्या कांद्याची आपल्या सभासदांकडून मोठ्या प्रमाणात लुटमार आणि चोरी होत आहे. स्त्री कामगार हे आपल्याबरोबर आणलेल्या पिशव्यांचा वापर फक्त चोरीसाठी करत असल्याचे निदर्शनास आले आहे. या चोरी केलेल्या कांद्याची विक्री बाजार समितीत तसेच बाजार समितीच्या आवाराबाहेर करतात. त्यामुळे कांदा व्यापाऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे, असे निवेदनात म्हटले आहे.
याबाबत बाजार समिती प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. ज्याप्रमाणे आपण मॉल, कापड दुकान, सराफी दुकानात जाताना आपल्या पिशव्या बाहेर ठेवतो. त्याप्रमाणे सदर महिला कामगारांनी समितीच्या आवारात येताना त्यांच्याकडील पिशव्या गेटवर जमा करणे बंधनकारक करण्यात यावे. या शिवाय त्यांचे कांदा भरण्याचे काम दुपारी २ वाजेपर्यंत संपते. त्यामुळे त्यांना दुपारी ३ नंतर समिती आवारात थांबू देऊ नये, अशी मागणी कांदा व्यापारी असोसिएशनने केली आहे.
----
बाजार समितीतील व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांकडून कांदा उतरवून घेण्याची वेळ दिली आहे. व्यापाऱ्यांकडून ती वेळ पाळली जात नाही. त्यामुळे असे प्रकार घडत आहेत. व्यापाऱ्यांनी दिलेल्या वेळेतच कांदा उतरवून घेतला तर असे प्रकार घडणार नाहीत.
- अभय भिसे,
सचिव, बाजार समिती नगर