...तर मस्साजोगसारखी घटना नगरमध्ये घडली असती; सुजय विखेंच्या वक्तव्याची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 12:33 IST2025-01-23T12:33:03+5:302025-01-23T12:33:50+5:30
आपण जर यावेळी चुकीच्या माणसाला निवडून दिले असते, तर बीडसारखे प्रकरण आपल्या अहिल्यानगरमध्ये झाले असते, असं सुजय विखेंनी म्हटलं आहे.

...तर मस्साजोगसारखी घटना नगरमध्ये घडली असती; सुजय विखेंच्या वक्तव्याची चर्चा
BJP Sujay Vikhe: बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची नराधमांनी निर्घृण हत्या केली. या प्रकरणाचे पडसाद राज्यभर उमटत असून बीड जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप करत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री धनंजय मुंडे यांना लक्ष्य केलं जात आहे. अशातच आता महायुतीतील भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनीही बीडचं नाव घेत आपल्या स्थानिक विरोधकांना टोला लगावला आहे. "विधानसभेची निवडणूक महत्त्वाची होती. आपण जर यावेळी चुकीच्या माणसाला निवडून दिले असते, तर बीडसारखे प्रकरण आपल्या अहिल्यानगरमध्ये झाले असते. तीन महिन्यांत मस्साजोगसारखी घटना घडली असती. मतदारांनी अहिल्यानगरला बीड होण्यापासून वाचवले," असं विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
अहिल्यानगर तालुक्यातील अकोळनेर येथे आमदार शिवाजी कर्डिले, काशीनाथ दाते, संग्राम जगताप यांचा ग्रामस्थांनी सन्मान केला. तसेच 'खेळ पैठणी'चा कार्यक्रमही पार पडला. या कार्यक्रमाला सुजय विखे उपस्थित होते. यावेळी केलेल्या भाषणात विखे यांनी विरोधकांचा समाचार घेतला.
सुजय विखे पुढे म्हणाले, "लोकसभा निवडणुकीत मला जरी नाकारले असले तरी अहिल्यानगर तालुक्याला पाणी द्यायच्या जबाबदारीचे खाते हे पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांना मिळाले आहे. पुढील निवडणुकीत पाणी देणाऱ्यालाच मतदान केले पाहिजे अशी प्रत्येकाने भूमिका ठेवली पाहिजे. कर्डिले, दाते, पाचपुते यांच्या सहकार्याने शब्द देतो की, अडीच वर्षांच्या काळात साकळाई पाणी अकोळनेर गावात आणल्याशिवाय परत येणार नाही," अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.