...तर समन्यायी पाणी वाटपाचा कायदा रद्द करून दाखवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2021 04:20 AM2021-03-28T04:20:10+5:302021-03-28T04:20:10+5:30

शिर्डी : तुम्ही स्वत:ला महाविकास आघाडीचे राज्याचे नेते समजता, तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा, ...

... then repeal the Equitable Water Allocation Act | ...तर समन्यायी पाणी वाटपाचा कायदा रद्द करून दाखवा

...तर समन्यायी पाणी वाटपाचा कायदा रद्द करून दाखवा

शिर्डी : तुम्ही स्वत:ला महाविकास आघाडीचे राज्याचे नेते समजता, तर मंत्रिमंडळात समन्यायी पाणी वाटप कायद्याचा निर्णय रद्द करून दाखवा, असे थेट आव्हान माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे यांनी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांना त्यांचे नाव न घेता दिले. कालपर्यंत निळवंडे प्रश्नावरून आम्हाला बदनाम करणारी मंडळी आता उशिरा का होईना कालव्यांच्या कामाबाबत खरे बोलू लागलेत. त्यांच्या तालावर झेंडे घेऊन नाचणाऱ्यांनी आता तरी डोळे उघडावीत, असा सल्लाही विखे यांनी दिला.

पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत शनिवारी आ. राधाकृष्ण विखे बोलत होते. ज्येष्ठ नेते अण्णासाहेब म्हस्के, खा.डॉ. सुजय विखे पाटील, बाळासाहेब भवर, नंदू राठी, डॉ. भास्करराव खर्डे, विश्वासराव कडू, कैलास तांबे, रामभाऊ भुसाळ, अण्णासाहेब कडू, कार्यकारी संचालक ठकाजी ढोणे याप्रसंगी उपस्थित होते. कारखान्याचे सभासद ऑनलाइन पद्धतीने या सभेत सहभागी झाले होते. विविध विषयांचे ठराव या सभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

आ. विखे यांनी केंद्र सरकारच्या धोरणामुळेच सहकारी साखर कारखानदारीला भविष्यात चांगले दिवस येणार असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी साखर कारखान्यांबाबत दूरदृष्टीने घेतलेल्या निर्णयांचा सकारात्मक परिणाम भविष्यात निश्चित दिसेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

विखे कारखान्याने भविष्यात ७ लाख मेट्रिक टनाचे उत्पादन घेण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. यासाठी उपलब्ध पाण्याचा वापर करावा लागणार असला तरी आपला पाण्याचा संघर्ष कमी झालेला नाही. कारण समन्यायी पाणी वाटपाचे भूत या जिल्ह्याच्या मानगुटीवर अनेक वर्षे बसले आहे. त्यावेळी सत्तेत बसलेल्या मंडळींनी जिल्ह्यातील पाणी वाहून जात असतानासुद्धा शब्द काढला नाही. सत्ता गेल्यानंतर पाणी देण्यास विरोध करू लागले. आता सत्ता तुमच्याच ताब्यात आहे. समन्यायी पाणी वाटपाचा कायदा रद्द करण्याची जबाबदारी आता तुमची आहे, असे विखे म्हणाले.

...

‘त्यांना’ नव्या नेतृत्वाची भीती होती

वर्षानुवर्षे रखडलेल्या निळवंडे धरण कालव्यांच्या कामांची सुरुवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतानाच झाली. मागील १० वर्षे ही कामे धरणाच्या मुखापासून सुरू होऊ शकली नाहीत. काहींना ही कामे सुरू होऊ द्यायची नव्हती. कारण कालव्यांची कामे झाली असती, तर त्यांच्या तालुक्यात पाणी आले असते. दुसरा कारखाना उभा राहिला असता, नवे नेतृत्व उभे राहिले असते, याची भीती त्यांना होती, अशी टीकाही आमदार राधाकृष्ण विखे यांनी थोरात यांच्यावर केली.

Web Title: ... then repeal the Equitable Water Allocation Act

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.