... मग, शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही; शिंदेंच्या प्रवक्त्यांनी दिले एकीचे संकेत
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2023 10:58 AM2023-01-02T10:58:38+5:302023-01-02T11:01:23+5:30
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनीही साईबाबांचे दर्शन घेतले
अहमदनगर - नववर्षानिमित्ताने शनि शिंगणापूर, शिर्डी येथे लाखो भाविकांनी दर्शन घेत नववर्षाचा श्रीगणेशा केला. शिंगणापूर येथे शनि देवाच्या शिळेवरती तेलाचा अभिषेक करण्यात आला. तर शिर्डीत साई चरणी लीन होत साई नामाचा गजर केला. नव वर्षानिमित्त साई मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती. आज वर्षारंभी साईमूर्तीवर सुवर्णालंकार घालण्यात आले होते. रविवारी मध्यरात्री बाराच्या ठोक्याला साई नामाचा व भजनाचा गजर करण्यात आला. राजकीय नेते आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनीही मध्यरात्रीच दर्शन घेतले. यावेळी, पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे प्रवक्ते आणि मंत्री दिपक केसरकर यांनी शिवसेना एकीचे संकेत दिले आहेत.
मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, महसूलमंत्री राधाकृष्ण विखेपाटील, शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांनीही साईबाबांचे दर्शन घेतले. यावेळी, माध्यमांशी बोलताना केसरकर यांनी शिवसेना आणि शिंदे गटातील मतभेदावर भाष्य केले. तसेच, आगामी काळात एकसंघ होण्याचे संकेतही दिले आहेत. ज्यांनी बाळासाहेबांच्या विचारांचा लढा लढवला, ती लोकं अशी सहजासहजी सोडून जात नाहीत. काहीतरी निश्चितपणे असं घडलंय, ज्यामुळे ही लोकं बाहेर पडली. ते काय घडलं याचं आत्मपरिक्षण जसं मी केलं पाहिजे, तसं आमच्या तेव्हाच्या पक्षप्रमुखांनीही करायला हवं. तसं झाल्यास शिवसेना एकसंघ व्हायला वेळ लागणार नाही, असे दिपक केसरकर यांनी म्हटले.
दिपक केसरकर यांचं हे विधान निश्चितच भविष्यातील शिवसेना आणि शिंदे गटाच्या एकत्रीकरणाचे संकेत देत आहे. मात्र, गेल्या काही महिन्यांत शिवसेना विरुद्ध शिंदे गट यांच्यातील राजकीय कुरघोडी आणि टिका-टिपण्णी पाहता हे कितपत शक्य आहे हे येणारा काळच दाखवून देईल. मात्र, सध्या तरी भाजप आणि शिंदे गट एकत्र असून आगामी निवडणुका एकत्र लढविण्याचा निर्धार बोलून दाखवत आहे. त्यामुळे, किमान आगामी महापालिका निवडणुकांपर्यंततरी वेट अँड वॉचच्याच भूमिकेत सर्वांना राहावे लागणार आहे.