इथे मरण सिद्ध करायला डाॅक्टरच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:19 AM2021-04-17T04:19:28+5:302021-04-17T04:19:28+5:30
कोतूळ : इथे मरणही महागले आहे, असे म्हणण्याची वेळ कोतूळ परिसरातील चाळीस गावांवर आली आहे. चाळीस गावांचे केंद्र असलेल्या ...
कोतूळ : इथे मरणही महागले आहे, असे म्हणण्याची वेळ कोतूळ परिसरातील चाळीस गावांवर आली आहे. चाळीस गावांचे केंद्र असलेल्या कोतूळ प्राथमिक आरोग्य केंद्रात सहा महिन्यांपासून डाॅक्टरच नाहीत, तर ग्रामीण रुग्णालयात दोनच डाॅक्टर आहेत.
अकोले तालुक्यातील कोतूळ या चाळीस गाव डांग भागातील केंद्राच्या गावात कोरोना महामारीबरोबर सरकारी अनास्थेची बीमारी आली आहे. कोतूळ येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दोन वैद्यकीय अधिकारी पदे आहेत. मात्र गेल्या वर्षभरात फक्त एकच वैद्यकीय अधिकारी काम पाहत होते.
सहा महिन्यांपूर्वी एकमेव वैद्यकीय अधिकारी डाॅ. भागवत कानवडे यांचा वैद्यकीय उपचारादरम्यान मृत्यू झाला. तेव्हापासून आजपर्यंत इथे डाॅक्टरच नाहीत. हे फक्त अकोले तालुक्यातच घडू शकते.
सध्या कोतूळ प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार दहा बाय दहाच्या एका कोंदट खोलीत चालतो. इथे दररोज चाळीस ते पन्नास लोक लसीकरण करतात. आरोग्य केंद्रात जागाच नसल्याने ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या तपासणी कक्षात लसीकरण सुरू आहे.
कोतूळ येथील ग्रामीण रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार एकाच इमारतीत चालतो मात्र ग्रामीण रुग्णालयात तीस खाटांचे कोविड केअर सेंटर झाल्याने इथली इमारत वापरता येत नाही, तर प्राथमिक आरोग्य केंद्राचे कोविड केअर सेंटर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत चार खोल्यांत आहे. दररोज या ठिकाणी किमान पंधरा ते कमाल पंचवीस कोरोना रुग्ण पाॅझिटिव्ह येतात. त्यातले काही खासगीत, तर काही या शाळेतील केंद्रात उपचार घेतात.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कोविड केअर सेंटरमध्ये आदिवासी भागातील गोरगरीब आदिवासी बांधव उपचार घेत आहेत मात्र इथे शासकीय जेवणच नसल्याने व कोतुळात लाॅकडाऊनमुळे खानावळी बंद असल्याने दररोज वीस- तीस किलोमीटरहून जेवणाचे डब्बे घेऊन हे आदिवासी बांधव येतात. मात्र कुठल्याही प्रकारची यांत्रिक सुविधा नसल्याने आणलेले अन्नही खराब होते. त्यामुळे रुग्णांना उपाशी रहावे लागते.
.........
मी दोन दिवसांपासून कोतूळ जिल्हा परिषद शाळेत विलगीकरण कक्षात उपचार घेत आहे. उपचार वेळत मिळतात मात्र जेवणाचे हाल होताहेत. घरून आलेला डब्बा दुपारी उकाडा असल्याने खराब होतो. बाहेरून कुणी जेवणही देत नाही. जमिनीवरच चादर अंथरुण झोपावे लागते.
-गौरव गोडसे, लहित खुर्द
( या बातमीसाठी कोटची आवश्यकता आहे)