मुळा धरणात सव्वा महीना पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 04:40 PM2018-06-13T16:40:54+5:302018-06-13T16:41:28+5:30
दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.
राहुरी: दक्षिण अहमदनगर जिल्ह्याची जीवनदायीनी असलेल्या मुळा धरणात महिनाभर पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे आज उजवा कालवा बंद करण्यात आला आहे. शेवटच्या उन्हाळी अवर्तनात ४० दिवसांमध्ये ५ हजार दशलक्ष्यघनफुट पाण्याचा वापर झाला आहे. सद्यस्थितीत धरणात पिण्यायोग्य पाण्याचा साठा ३१३ दलघफु असून हा पाणीसाठा महीनाभर पुरेल, असे पाटबंधारे खात्याकडून सांगण्यात आले.
२६ हजार दलघफु पाणी साठवण क्षमता असलेल्या मुळा धरणात ४ हजार ८१३ दलघफु पाणी शिल्लक आहे़ मृत पाणी साठा ४५०० दलघफु आहे. दररोज ८ दलघफु पाणी खर्च होत आहे. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही.
मुळा धरणाच्या उजव्या कालव्याखाली २७९ पाणी वापर सहकारी संस्था आहे. पाणी वाटप संस्थेच्या माध्यमातुन शेतीसाठी पाणी वाटप करण्यात आले आहे. उजव्या कालव्याखाली किती क्षेत्र भिजले याबाबत पाटबंधारे खात्याकडे आकडेवारी उपलब्ध झालेली नाही. सलग दोन वर्ष मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला. गेल्या वर्षी धरणावर ७८० मिलीमिटर पाऊस पडला. त्यामुळे धरणाच्या ११ मो-यातून जायकवाडीला पाणी सोडण्यात आले होते. मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर यंदा पावसाचे प्रमाण घटण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे यंदा मुळा धरण भरणार का याबाबत शेतक-यांमध्ये उत्सुकता आहे.
मुळा धरणाच्या पाणलोट क्षेत्रावर अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. यंदा पिण्याच्या पाण्याची टंचाई नाही. १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पिण्याच्या पाण्याचा साठा उपलब्ध आहे. - रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे विभाग