३ महिने झालं पाऊस नाही, पेरण्याही गेल्या; अण्णा हजारेंची सरकारकडे मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 01:36 PM2023-09-14T13:36:55+5:302023-09-14T14:15:10+5:30
जूनपासून ३ महिने झालं पाऊस नाही, पहिल्यांदाच असं घडतंय. खरिपाच्या पेरण्याही गेल्या.
मुंबई/अहमदनगर - राज्यात पावसाने दडी मारल्यामुळे येणाऱ्या काळात दुष्काळाचे संकट घोगावू लागले आहे. जूनपासून आजवर १०२ दिवसांत सरासरी ३० दिवसच पाऊस मराठवाड्यात बरसला असून ७ सप्टेंबरपासून पुनरागमन केलेल्या पावसानेदेखील दोन दिवसांपासून काढता पाय घेतला आहे. गेल्या ५ दिवसांत थोडाच व काही ठिकाणीच पाऊस पडला. त्यामुळे शेतकरी चिंताग्रस्त असून खरीप हंगामातील पिके धोक्यात आली आहेत. सोयाबिन, तूर, ज्वारीसह फळबागाही पाण्याअभावी जळून जाण्याची भीती आहे. त्यामुळे, शासनाने दुष्काळग्रस्त परिस्थिती पाहता शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांनी केली आहे.
जूनपासून ३ महिने झालं पाऊस नाही, पहिल्यांदाच असं घडतंय. खरिपाच्या पेरण्याही गेल्या. त्यामुळे, सरकारने तुमचा पक्ष आणि पार्ट्या काय करायचंय ते करावं, पण शेतकऱ्यांना मदत करावी, अशी मागणीच ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी केली. तसेच, हे मानवतेला धरुन योग्य असल्याचंही अण्णांनी म्हटलं. सरकार आणि विरोधकांनी बसून विचार केला पाहिजे, दोघांनी समन्वयाने शेतकऱ्यांसाठी योग्य तो निर्णय घ्यावा, असेही अण्णांनी मीडियाशी बोलताना म्हटले.
राज्यात ऑगस्टमध्ये पावसाने ओढ दिल्याने ऐन फुलोऱ्यातील सोयाबीन पिकाला मोठा फटका बसला असून, सोयाबीनच्या उत्पादनात सरासरीच्या तुलनेत ६ टक्क्यांनी घट होईल, असा अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे. सोयाबीनची राज्यात सर्वात जास्त क्षेत्रावर लागवड झाली असून, भात पिकालाही पावसाच्या खंडाचा फटाका बसला आहे. भाताच्या उत्पादकतेतही १३ टक्क्यांची घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते सोयाबीनच्या उत्पादनात ही घट किमान १५ ते २० टक्के व कापूस पिकात किमान ५ ते १० टक्के घट येऊ शकते.
जूनपासून किती पाऊस?
मराठवाड्यात जून महिन्यापासून आजवर ६७९ मि.मी.च्या तुलनेत ४५७ मि.मी. पाऊस झाला आहे. २२२ मि.मी.पावसाची तूट असून पावसाळा संपण्यासाठी १७ दिवस शिल्लक राहिले आहेत.
खरिपाची पीके धोक्यात
कृषी विभागाने केलेल्या अंदाजानुसार सर्वाधिक ६७ टक्के घट खरीप ज्वारी, तर ६६ टक्के घट बाजरी पिकात होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.
मक्याच्या उत्पादनात ४१ टक्के घटीचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मुगाचे उत्पादन ६६ टक्क्यांनी, तर उडीद पिकाचे उत्पादन ५० टक्क्यांनी घटणार आहे. मात्र, भात पिकात १३ टक्के वाढ होण्याचा अंदाज आहे.
शासन शेतकऱ्यांच्या पाठिशी - कृषीमंत्री मुंडे
राज्यातील बहुतांश भागात व विशेषकरून मराठवाड्यात अद्यापही समाधानकारक पाऊस झालेला नाही, परतीच्या पावसाने पाण्याची कमी भरून निघेल अशा अपेक्षा असल्या तरीही खरीप हंगामातील पिकांवर संकट आहे. या काळात राज्य सरकार सर्वार्थाने शेतकऱ्यांना दिलासा व आधार देण्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहिल, असे कृषीमंत्री धनंजय मुंडेंनी म्हटलं आहे. शेतकऱ्यांना हक्काचा पीकविमा मिळण्यासाठी शासन कटिबद्ध राहून निर्णय घेत आहे. त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री व दोन्हीही उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून अन्य आवश्यक उपाययोजना देखील करण्यात येतील, असा विश्वास यानिमित्ताने धनंजय मुंडे यांनी व्यक्त केला आहे.