दुग्धविकास मंत्र्यांच्या आश्वासनाशिवाय आता माघार नाही, राष्ट्रवादीची आक्रमक भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2024 06:01 PM2024-07-06T18:01:09+5:302024-07-06T18:01:17+5:30
खासदार लंकेंना पाठबळ देण्यासाठी जयंत पाटील, बाळासाहेब थोरात मैदानात
प्रशांत शिंदे
अहमदनगर- कांदा व दूध दरवाढीसाठी खासदार नीलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या दिवशी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरूच आहे. आता येथे जिल्हाधिकारी आले तरीदेखील आंदोलन मागे घेतले जाणार नाही. जोपर्यंत दुग्धविकास मंत्री येथे येत नाहीत आणि दुधाचा दर जाहीर करत नाहीत तोपर्यंत आम्ही येथून उठणार नाही, असा इशारा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिला आहे. या आंदोलकांना पाठिंबा देण्यासाठी रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार) प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरातदेखील येणार आहेत.
राजेंद्र फाळके म्हणाले की, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे रविवारी जिल्हा दौऱ्यावर आहेत. त्यांनी आंदोलन स्थळी येऊन आंदोलकांना दूध दरवाढीचे आश्वासन दिले तरच आंदोलन मागे घेतले जाईल. अन्यथा शरद पवारदेखील आंदोलनात उतरतील. सगळी खात्री करून आलो आहे. नेत्यांशी बोललेलो आहे. शासनाला आंदोलकांच्या मागण्या मान्य करायच्या नसतील तर महागात पडेल. आज आंदोलन जिल्हापुरते मर्यादित आहे. उद्या राज्यातले लोक येथे येतील, परवा देशातले लोकदेखील आंदोलनात सहभागी होतील. प्रशासनाला वाटत असेल की फक्त शरद पवार येतील पण देशाचे नेते विरोधी पक्ष नेते राहुल गांधी देखील येथे येतील. हे आंदोलन हलक्यात घेत असतील त्यांना हा इशारा आहे.
पालकमंत्री आपण राज्यामध्ये मंत्री आहात आणि दुग्ध विकास मंत्री आहात. जिल्हाधिकाऱ्यांच्या दारामध्ये जिल्ह्यातला शेतकरी येऊन उत्पादन खर्चावर दुधाचे दर मागतोय पण तुम्ही कुठल्या कोण्यामध्ये झोपलेला आहात? आंदोलकांना सामोरे गेला पाहिजेत, त्यांना सांगितलं पाहिजेत की एवढा खर्च उत्पादनाला येतो आणि राज्य सरकारने एवढा निर्णय घेतलाय, असेही फाळके यांनी म्हटले आहे.