भाव नसल्याने श्रीरामपुरातील शेतक-याने टोमॅटोच्या पिकात वाजत-गाजत सोडल्या मेंढ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 05:34 PM2018-04-15T17:34:31+5:302018-04-15T17:57:11+5:30
शेतातील कोबी, फ्लॉवरनंतर भाव नसल्याने टोमॅटोच्या पिकातूनही खर्च फिटला नाही. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या युवा शेतक-याने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वाजत-गाजत व फित कापून मेंढ्यांचा कळप उभ्या पिकात घातला.
श्रीरामपूर : शेतातील कोबी, फ्लॉवरनंतर भाव नसल्याने टोमॅटोच्या पिकातूनही खर्च फिटला नाही. यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या युवा शेतक-याने या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी वाजत-गाजत व फित कापून मेंढ्यांचा कळप उभ्या पिकात घातला. पाचवीच्या वर्गात शिकणारी या शेतक-याची मुलगी ईश्वरी हिने वडिलांची आर्थिक फरपट पाहता सहलीला जाण्यासाठी मी मनाला मुरड घातल्याचे सांगितले. यावेळी सर्व उपस्थित भावूक झाले.
श्रीरामपूर तालुक्यातील शिरसगाव येथील शेतकरी नितीन बाबासाहेब गवारे यांनी आपल्या शेतातच शनिवारी हे आंदोलन केले. त्यांना आई, वडील, पत्नी व एक मुलगा मुलगी असा परिवार आहे. विशेष म्हणजे नितीन हे पदवीधर तर त्यांच्या पत्नी या पदव्युत्तर पदवीधर आहेत. गवारे यांना तीन एकर जमीन आहे. त्यामुळे दैनंदिन खर्च भागविण्याकरिता त्यांना भाजीपाल्याची पिके घ्यावी लागतात. नुकतेच कोबी आणि फ्लॉवरच्या घेतलेल्या पिकातून उत्पादन खर्च निघाला नाही. मजुरी व वाहतुकीचा खर्च वजा जाता बाजारात विक्री परवडत नसल्याने जनावरांना पिक खाऊ घातले. टोमॅटो एक ते दीड रूपया किलोने विकला जातो आहे. अखेर या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन केल्याचे गवारे यांनी सांगितले. श्रीरामपूरसह नेवासा व राहाता तालुक्यातील शेतकरी ही सहभागी झाले होते. फीत कापून मेंढ्यांना टोमॅटोच्या पिकात सोडण्यात आले. आंदोलनाचे कुठल्याही स्वरूपाचे निवेदन पोलीस व प्रशासनाला दिले नाही. त्यामुळे शहर पोलिसांनी आंदोलन करता येणार नाही, असे आदेश दिले. मात्र आपलेच शेत व आपलेच पिक असल्याने परवानगीची गरजच काय? असा उलट सवाल गवारे यांनी यावेळी केला. आंदोलनस्थळी अनेक शेतक-यांनी संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या. २०० ते ३०० शेतकरी यावेळी उपस्थित होते.