'काँग्रेस पक्षात आता आत्मा राहिलेला नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 25, 2019 02:20 AM2019-09-25T02:20:23+5:302019-09-25T02:20:41+5:30
राधाकृष्ण विखे यांची बाळासाहेब थोरांतावर टीका
संगमनेर (जि. अहमदनगर) : ज्यांनी पक्षाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी स्वीकारली त्यांच्याच अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. राज्यात परिवर्तन करील, असे म्हणणारेच आज स्वत:च्या तालुक्यात पक्षाला उभारी देऊ शकत नाहीत ते राज्यात पक्ष कसा उभा करणार? काँग्रेस पक्षात आत्माच राहिलेला नाही, अशी खोचक टीका गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केली.
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यकाळात पक्षाची अधोगती सुरू झाली. आपले अपयश झाकण्यासाठी दुसऱ्यावर दोषारोप करण्याचा धंदा त्यांनी आता तरी बंद करावा. संगमनेर येथे भाजप, शिवसेना कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी नाव न घेता थोरात यांच्यावर टीका केली.
विखे म्हणाले, राज्यात भाजप आणि शिवसेना युती होईलच. संगमनेर तालुक्याचा विचार केला, तर जे स्वत:च्या तालुक्यात आता उभारी घेऊ शकत नाही, ते पक्षाला राज्यात कशी उभारी देणार. त्यांच्या जवळच आता माणसे राहत नाहीत. शरद पवार यांना भावनिक आवाहन करण्याची वेळ का आली? हा प्रश्न आपल्या कार्यकर्त्यांना विचारला पाहिजे.