शंभर कॅबिनेट होऊनही धनगर समाजाला आरक्षण नाही - सुप्रिया सुळे
By Admin | Published: May 31, 2017 04:18 PM2017-05-31T16:18:45+5:302017-05-31T16:18:45+5:30
धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. भाजप सरकारने आरक्षणाचे गाजर दाखवून सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर अभ्यासाचे कारण देत आरक्षणास टाळाटाळ केली
लोकमत न्यूज नेटवर्क
जामखेड (अहमदनगर) : धनगर समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय सर्वप्रथम राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला होता. भाजप सरकारने आरक्षणाचे गाजर दाखवून सत्ता मिळवली मात्र सत्तेत आल्यानंतर अभ्यासाचे कारण देत आरक्षणास टाळाटाळ केली. बारामतीत आल्यानंतर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाचा आरक्षणाचा निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले होते. परंतु त्यानंतर शंभर कॅबिनेट झाल्या तरी आरक्षणाचा निर्णय झाला नाही,अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रियाताई सुळे यांनी भाजपा सरकारवर केली. खा. सुप्रियाताई सुळे यांनी चौंडीत येऊन पुण्यश्लोक अहल्यादेवी यांचे दर्शन घेऊन नक्षत्र उद्यानाची पाहणी केली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ज्येष्ठ नेते गणपतराव देशमुख, माजी मंत्री आण्णासाहेब डांगे, महीला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घुले, सरचिटणीस सोमनाथ धूत, राजेंद्र फाळके, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा मंजुषा गुंड, राजेंद्र कोठारी उपस्थित होते. खा.सुळे म्हणाल्या, सरकार तीन वर्षांपासून अभ्यास करत आहे मात्र अद्यापही आरक्षणाचा निर्णय घेता आलेला नाही. सरकारचे अपयश झाकण्यासाठी शिवार संवाद यात्रा सुरू केली आहे. या भाजप सरकारच्या काळात सर्वाधिक आत्महत्या झाल्या. सरकार शेतक-यांना हमी भाव देण्याऐवजी जाहिरातींवर खर्च करीत आहे. हा खर्च कमी केल्यास हमी भाव देणे शक्य होईल. आघाडी सरकारने अहल्यादेवींचे जन्मगाव चौंडी येथे विकासासाठी तेरा कोटीचा निधी देऊन पर्यटन स्थळाचा दर्जा दिला, असेही सुळे म्हणाल्या. अद्ययावतग्रंथालय सुरू करण्याबाबत माजी मंत्री आण्णासाहेब डांगे यांना सुचना दिल्या.