गृह विलगीकरणातील रूग्णाच्या घरातील कचरा संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था नाहीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2021 04:18 AM2021-04-14T04:18:30+5:302021-04-14T04:18:30+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : शहरातील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाच्या घरातील कचरा हा कोपरगाव नगरपरिषद मार्फत दैनंदिन कचरा संकलन ...

There is no separate arrangement for garbage collection in the home separation patient's home! | गृह विलगीकरणातील रूग्णाच्या घरातील कचरा संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था नाहीच !

गृह विलगीकरणातील रूग्णाच्या घरातील कचरा संकलनासाठी स्वतंत्र व्यवस्था नाहीच !

लोकमत न्यूज नेटवर्क

कोपरगाव : शहरातील गृह विलगीकरणात असलेल्या रुग्णाच्या घरातील कचरा हा कोपरगाव नगरपरिषद मार्फत दैनंदिन कचरा संकलन करणाऱ्या गाडीतच संकलित केला जातो. त्यामुळे असा कचरा कोरोनाचा फैलाव होण्यास कारणीभूत ठरून प्रसार वाढू शकतो, अशी शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.

कोपरगाव शहराची लोकसंख्या सुमारे १ लाखांच्या आसपास असून घरांची संख्या अंदाजे २२ हजारांच्यावर आहे. या सर्व घरातील दैनंदिन निघणारा ओला व सुका कचरा हा नगरपरिषदेच्या स्वच्छता विभागाचे कर्मचारी व घंटा गाड्यांच्या माध्यमातून संकलित केला जातो. संकलित केलेल्या ओल्या व सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्याची विल्हेवाट लावली जाते.

गेल्या मार्च महिन्यापासून शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणात कोरोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे शहरातील कोविड केअर सेंटर, कोविड हेल्थ सेंटर, खासगी कोविड हेल्थ सेंटर हे बाधित रुग्णांमुळे खचाखच भरलेली आहेत. तर आजही दिवसागणिक रुग्ण वाढतच असल्याने बेड उपलब्ध होणे देखील मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे ज्या बाधित रुग्णांना लक्षणे नाहीत व त्यांच्या घरी ते स्वतःचे विलगीकरण करून राहू शकतात अशा रूग्णांना गृह विलगीकरणाचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे. त्यानुसार शहरात सध्या शेकडो बाधित रुग्ण हे गृह विलगीकरणात आहेत. परंतु, असे रुग्ण गृह विलगीकरणात असताना त्यांच्या घरातून निघणारा कचरा संकलनासाठी नगरपरिषदेकडून कोणतीच स्वतंत्र व्यवस्था केलेली नाही. दैनंदिन कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाडीतच एका कोपऱ्यात हा कचरा संकलित केला जातो. त्यानंतर त्याची विल्हेवाट लावली जाते.

...........

कोरोना बाधित रुग्णांच्या संपर्कातील कचरा हाताळताना जर कर्मचाऱ्याने मास्क घातलेला नसेल तर तो बाधित होण्याची दाट शक्यता असते. मास्क असेल तर घाबरण्याचे कारण नाही. मात्र, कचऱ्यावर, जमिनीवर हा विषाणू १२ तास सक्रिय असतो. त्यामुळे या काळात अशा पद्धतीने कुणाचा संपर्क आल्यास बाधा होऊ शकते. त्यामुळे अशा कचऱ्याची व्यवस्थितरीत्या विल्हेवाट लावणे गरजेचे आहे.

- डॉ. कृष्णा फुलसौंदर, वैद्यकीय अधीक्षक , ग्रामीण रुग्णालय, कोपरगाव

............

शहरातील गृह विलगीकरणातील रुग्णांच्या घरातील कचरा हा दैनंदिन कचरा संकलन करणाऱ्या घंटा गाडीतूनच संकलित केला जातो. मात्र, तो संकलित करताना गाडीत एका बाजूला ठेवला जातो. त्यानंतर कचरा डेपोवर त्या कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते.

- सुनील आरण, स्वच्छता निरीक्षक, आरोग्य विभाग, न. प. कोपरगाव

...............

शहरात रोज निघणारा कचरा - २० टन

ओला कचरा - १० टन

सुका कचरा - ०७ टन

इतर कचरा - ०३ टन

कचरा एकत्र करणारे कर्मचारी - २३०

...........

शहरातील एकूण रुग्ण - २,६९२

बरे झालेले रुग्ण - २,११५

उपचार घेत असलेले रुग्ण - ५४३

गृह विलगीकरणातील रुग्ण - १५१

.............

Web Title: There is no separate arrangement for garbage collection in the home separation patient's home!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.