पाथर्डीत लॉगबुकवर सह्याच नाहीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2019 02:33 PM2019-05-11T14:33:20+5:302019-05-11T14:33:31+5:30
तालुक्यातील दुष्काळी भागाला शासनाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली आहे.
हरिहर गर्जे
पाथर्डी : तालुक्यातील दुष्काळी भागाला शासनाच्या पाणीपुरवठा विभागामार्फत टँकरने करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यात मोठ्या प्रमाणावर अनियमितता आढळली आहे.
धामणगाव येथे शुक्रवारी सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पाणीपुरवठा करणाºया एम. एच १२ ए. यू.४६९९ या टँकरची तपासणी केली असता चालक रमजान फकीर यांच्याकडे पाणी वाटपासंदर्भातील नोंदीचे लॉगबुक आढळून आले नाही. त्याचेकडे लॉगबुकची मागणी केली असता त्याने दुसरा टँकर क्रमांक एम.एच.१६ बी.३०७ याचे लॉगबुक दाखवले. त्यात ३० एप्रिलपर्यंत टँॅकर खाली होण्याची वेळ, खेपेचे अंतर, पाणीपुरवठा व स्वछता महिला समितीच्या सदस्य, ग्रामसेवक, मुख्याध्यापक यांच्या सह्यांचे रकाने कोरे असल्याचे दिसून आले. संबंधित गाडीच्या लॉगबुकबाबत विचारणा केली असता ते ग्रामसेवकांकडे सही करायला दिल्याचे चालकाने सांगितले.
जी.पी.एस. यंत्रणा आढळून उघड्या वायरच्या जाळ्यात असून त्याची पिन काढून ठेवण्याची सुविधा करण्यात आल्याचे दिसून आले. धामणगाव येथील महिलांना विचारणा केली असता त्यांनी १५ दिवसांतून एकदा अतिशय कमी प्रमाणात पाणी पुरवठा होत असून आजपर्यंत कोणीही त्यांची लॉगबुकवर सही घेतली नसल्याचे सांगितले.
पाण्यासाठी कायपण!
मोहटे गावात आठ दिवसांनी अपुºया प्रमाणात पाणी पुरवठा होत असून पाणी विहिरीत सोडण्यात आले. त्यामुळे पाणी भरण्यासाठी येथे एकच जीवघेणी गर्दी झालेली दिसली. महिला, पुरूष, लहान मुले, वृद्ध मिळेल ते भांडे घेऊन पाणी पदरात पाडून घेत होते. काही तरूण विहिरीच्या कठड्यावर उभे राहून पाणी शेंदत होते. गर्दीतील एखाद्याचा हलकासा धक्का बसला तर संबंधित तरूणाच्या जीविताला धोका निर्माण होणार होता.
फुंदे टाकळी येथेही अशीच अनियमितता होती. आठ दिवसांपूर्वी येथे खासगी विहिरीत पाणी सोडताना टँकर चालक आढळल्याने याच्यावर चोरीचा गुन्हा दाखल झाला होता. येथील टँकरच्या लॉगबुकवर प्रत्येक फेरीला गावातील वेगवेगळ्या व्यक्तीच्या सह्या घेतल्या जात असल्याने मागील खेपेला कधी पाणी वाटप झाले याबाबत माहिती नागरिकापासून दडवली जात असल्याचे ग्रामस्थ दादासाहेब फुंदे यांनी सांगितले.