हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है; अहमदनगर येथे ४०५ जवानांनी घेतली देशसेवेची शपथ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 3, 2018 05:13 PM2018-02-03T17:13:33+5:302018-02-03T17:13:58+5:30
‘जिंदगी की असली उडाण अभी बाकी है, हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, आगे सारा आसमान अभी बाकी है’ या बुलंद आत्मविश्वासाने देशाचे भावी सैनिक देशसेवेसाठी सज्ज झाले.
अहमदनगर : ‘जिंदगी की असली उडाण अभी बाकी है, हमारे इरादो का इम्तिहान अभी बाकी है, अभी तो नापी है मुठ्ठीभर जमीन, आगे सारा आसमान अभी बाकी है’ या बुलंद आत्मविश्वासाने देशाचे भावी सैनिक देशसेवेसाठी सज्ज झाले.
एमआयआरसी या सैन्य प्रशिक्षण केंद्रातून तब्बल ३६ आठवड्यांचे खडतर प्रशिक्षण घेऊन ४०५ छात्रांनी सैन्यदलात प्रवेश केला. एमआयआरसी येथे शनिवारी (दि. ३) भल्या सकाळी झालेल्या शपथग्रहण सोहळ्यात या छात्रांनी आपापल्या धर्मगुरूंकडून देशसेवेची शपथ घेतली. तत्पूर्वी छात्रांनी शानदार संचलनाने लेफ्टनंट जनरल पी. सी. थिमैया, एमआयआरसीचे कमांडंट ब्रिगेडिअर व्ही. व्ही. सुब्रमण्यम व कर्नल रिसेल डिसुजा यांना सलामी दिली.
भल्या सकाळी एमआयआरसीच्या अखोरा ड्रिल मैदानावर सैनिक बँडच्या आवाजात लयबद्ध संचलन करून छात्र जवानांनी उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. परेड निरीक्षकांच्या आवाहनानुसार छात्रांनी मैदानात फेरी मारली. लेफ्टनंट जनरल थिमैया यांनी उघड्या जीपमधून परेडचे निरीक्षक केले. जवानांनी आपापल्या धर्मगुरूंकडून धर्मग्रंथावर हात ठेवत सदैव देशरक्षणाची शपथ घेतली.
जवानांना संबोधित करताना थिमैया म्हणाले, की देशाचे रक्षण करणे हे सैनिकाचे प्रथम कर्तव्य असते. त्यासाठी प्राणाची बाजी लागली तरी हरकत नाही. वीरता आणि विश्वास या दोन शब्दांना पुढील आयुष्यात सार्थ ठरवा. आपल्या नागरिकांचे व देशाचे रक्षण करून जवानांनी सर्वच क्षेत्रात नाव उंचवावे. येथील अधिकाºयांनी उच्च दर्जाचे प्रशिक्षण देऊन या जवानांचे सामान्य नागरिकातून सक्षम सैनिकात रूपांतर केले आहे. त्यामुळे या युवा जवानांच्या खांद्यावर देशाचे भविष्य सुरक्षित असल्याचा विश्वास थिमैया यांनी व्यक्त केला.
उत्कृष्ट तीन छात्रांचा गौरव
या प्रशिक्षणादरम्यान ४०५ छात्रांमधून तिघांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यामुळे त्यांचा विशेष गौरव करण्यात आला. यात नंदन सिंह याला जनरल सुंदरजी सुवर्णपदक, विक्रम सिंह जैस्वाल याला जनरल के. एल. डिसुजा रौप्यपदक, तर हरजित सिंह याला जनरल पंकज जोशी कांस्यपदकाने सन्मानित करण्यात आले.
पालकांचाही सन्मान
पासिंग आऊट परेडनंतर छात्रांच्या पालकांचा यथोचित गौरव करण्यात आला. देशासाठी आपला मुलगा समर्पित केल्याची भावना त्यांच्या चेह-यावर साफ दिसत होती. अधिका-यांनी प्रत्येक पालकाचा पदक देऊन सन्मान केला.