राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
By शेखर पानसरे | Published: May 19, 2024 07:19 PM2024-05-19T19:19:10+5:302024-05-19T19:19:25+5:30
'देशात भाजप सरकारविरुद्ध मोठी लाट आहे.'
घारगाव : मागील दोन-तीन महिने लोकसभेची रणधुमाळी सुरू असताना महाविकास आघाडीच्या प्रचाराची धुरा सांभाळली, संपूर्ण राज्यभर दौरा करावा लागला. सर्व प्रचार सभांना मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. देशात भाजप सरकारविरुद्ध मोठी लाट असून राज्यात महाविकास आघाडीच्या ४० च्या पुढे जागा येतील, अशा आशावाद माजीमंत्री, आमदार बाळसाहेब थोरात यांनी व्यक्त केला.
रविवारी (दि.१९) आमदार थोरात यांनी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील गावांमध्ये जाऊन तेथील ग्रामस्थांशी संवाद साधत, त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. अनेक भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून त्या संदर्भाने तातडीने उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या आहेत.
आमदार थोरात यांनी साकूर गटातील शेंडेवाडी, सतीची वाडी, हिवरगाव पठार, गिऱ्हेवाडी आदी ठिकाणी भेट दिली. संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या मीरा शेटे, थोरात सहकारी साखर कारखान्याचे संचालक इंद्रजित खेमनर, हिवरगाव पठारच्या सरपंच सुप्रिया मिसाळ, उपसरपंच दत्तात्रय वनवे, ग्रामपंचायत सदस्य सुवर्णा डोळझाके, माजी सरपंच भाऊसाहेब नागरे, करीम शेख, सचिन खेमनर, जयराम ढेरंगे आदी यावेळी उपस्थित होते.