या ‘तीन’ गोष्टीने वाढते इम्युनिटी, कोरोना बाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८१ टक्के
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2020 12:09 PM2020-08-25T12:09:54+5:302020-08-25T12:10:23+5:30
कोरोनाचा रुग्ण बरा होऊन घरी परतला जातो, तेव्हा त्याला तीन बाबींची अंमलबजावणी करण्याचा कोविड सेंटरमधील डॉक्टरांकडून हमखास सल्ला दिला जातो. शेवग्याच्या शेंगाची भाजी, कच्चे टोमॅटो आणि गरम पाणी सतत पित रहा, असे सांगितले जाते. याशिवाय कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याबाबतही सांगण्यात येते, असे एका बऱ्या झालेल्या रुग्णाने सांगितले.
सुदाम देशमुख
अहमदनगर : जिल्ह्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असले तरी बरे होऊन घरी जाणाºया रुग्णांचेही मोठे प्रमाण आहे. हे प्रमाण तब्बल ८१ टक्के
इतके आहे. बाधितांची संख्या एकीकडे वाढत असली तरी बरे होणाऱ्यांची दुसरीकडे संख्या वाढत आहे. यामुळे केवळ १७ टक्केच रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
बरे झालेल्या ८१ टक्के रुग्णांना कोरोनाची कोणतीही लक्षणे नसल्याने ते पाच ते सात दिवसांच्या आतच घरी जात असल्याचे दिसून येत आहे.
एकीकडे जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या रोज पाचशेपर्यंत जाते. त्यामुळे जिल्ह्यात भितीदायक वातावरण आहे. मात्र पॉझिटिव्ह रुग्णांपैकी ९० टक्के रुग्णांना कोणतीही लक्षणे नसल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणा सांगत आहे.
अशा लक्षणे नसलेल्या रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये ठेवले जात आहे. तेथे त्यांची चहा, नाश्ता, जेवण, व्यायामाची व्यवस्था केली जाते. इम्युनिटी वाढविणारी औषधे दिली जातात. त्यामुळे रुग्णाला पाच दिवस कोविड सेंटरमध्ये ठेवले जात आहे. पाच दिवसानंतर आणखी पाच ते सात दिवस घरी थांबण्याचा
सल्ला दिला जातो. त्यानंतर तो रुग्ण दहा दिवस होम क्वारंटाईन असतो. बारा दिवसानंतर त्याला समाजात वावरण्याची परवानगी दिली जाते.
जून, जुलैमध्ये कोरोनाच्या रुग्णांची एकूण संख्या पाचशे ते एक हजारांच्या आत होती. जुलैच्या मध्यापासून ते आॅगस्टच्या मध्यापर्यंत ही संख्या वाढून थेट १७ हजारांच्यावर गेली आहे. कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढल्याचे दिसत आहे. मात्र बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण ८१ टक्क्यांच्यावर गेल्याने जिल्हा आरोग्य यंत्रणेचाही जीव भांड्यात पडला आहे.
----------------
सुरवातीच्या काळात कोरोनाच्या रुग्णांवर उपचार कसे करावेत, याबाबत डॉक्टरांकडे फारसे अनुभव नव्हते. आता उपचार पद्धतीत सुधारणा झाली आहे. तसेच ९० टक्के रुग्णांना लक्षणेही आढळून येत नाहीत. तरीही अशा पॉझिटिव्ह रुग्णांना इम्युनिटी वाढविण्याची औषधेही उपलब्ध झाली असून ती दिली जात आहेत. या सर्वांचा एकत्रित परिमाण म्हणून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असून ही चांगली बाब आहे.
-डॉ. सुनील पोखरणा, प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक