वाहतूक कोंडी सुरळीत करणारे ‘ते’ आजोबा निघाले निवृत्त अधिकारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2021 04:37 AM2021-02-21T04:37:42+5:302021-02-21T04:37:42+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कोपरगाव : शहरालगत जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गावरील साईबाबा कॉर्नर येथे सोमवारी (दि.८ ) वाहतूक पोलीस जागेवर नसल्याने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कोपरगाव : शहरालगत जाणाऱ्या नगर-मनमाड महामार्गावरील साईबाबा कॉर्नर येथे सोमवारी (दि.८ ) वाहतूक पोलीस जागेवर नसल्याने मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली होती. त्यावर एका ८० वर्षांच्या आजोबांनी रस्त्यावर उतरवून ती वाहतूक कोंडी सुरळीत केली होती. त्याची दखल घेत ‘लोकमत’ ने मंगळवारी ९ फेब्रुवारीच्या अंकात त्या आजोबांची वाहतूक कोंडी सुरळीत करतांनाचा फोटोसह बातमी प्रकाशित केली होती. परंतु, त्यांचे नाव समजू शकले नव्हते.
त्यावर ही बातमी ऑनलाईन तसेच वर्तमानपत्रांतून मोठ्या प्रमाणात वाचली गेली. तशीच वाचकांमार्फत बातमी थेट त्या आजोबापर्यंतही पोहचली. त्यातून त्यांची माहिती समोर येत ते श्रीरामपूर तालुक्यातील फत्याबाद येथील रहिवासी आहेत. त्यांचे नाव जयराम दादा हाळनोर असे असून ते श्रीरामपूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागाचे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी आहेत.
याघटनाक्रमाविषयी जयराम हाळनोर म्हणाले, सोमवारी नातेवाईकांच्या लग्नासाठी येवला येथे वऱ्हाडाच्या बसमधून आम्ही जात होतो. कोपरगाव येथील साईबाबा कॉर्नर येथे आल्यानंतर वाहतूक कोंडीमुळे खूप वेळ होऊनही बस जागेवरून हालत नव्हती. त्यावर मी रस्त्यावर उतरून साईबाबा कॉर्नर येथील चौकातील वाहतूक कोंडी बराच वेळ रस्त्यावर थांबून सुरळीत केली. या कोंडीतून आमची वऱ्हाडाच्या बसला रस्ता मिळाला. आणि मी त्यात बसून विवाह सोहळ्यास निघून गेलो.
.........
आजोबांनी व्यक्त केले ‘लोकमत’ चे आभार
कोपरगाव शहरातील वाहतूक कोंडी सुरळीत करण्यासाठी रस्त्यावर उतरल्याने माझी दखल घेत माझा फोटो वर्तमान पत्रात छापला. बातमीत नाव जरी नसले, तरी माझा फोटो ओळखून खूप मित्र, नातेवाईकांचे फोन आले. विशेष म्हणजे त्यातील काही तर आता मला गमतीने ‘ट्राफिक हवालदार’ म्हणून संबोधून लागले आहेत. त्यामुळे ‘लोकमत’ चे विशेष आभार व्यक्त करतो, अशी भावना जयराम हाळनोर यांनी व्यक्त केली.
..........