२९४ आठवड्यांपासून करताहेत कोपरगावची स्वच्छता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2021 04:14 AM2021-01-01T04:14:58+5:302021-01-01T04:14:58+5:30

कोपरगाव : कोपरगाव शहरातील साई सेवा भक्त मंडळाचे सर्व सदस्य म्हणजेच स्वच्छता भुतं. सप्टेंबर २०१४ पासून प्रत्येक रविवारी ...

They have been cleaning Kopargaon for 294 weeks | २९४ आठवड्यांपासून करताहेत कोपरगावची स्वच्छता

२९४ आठवड्यांपासून करताहेत कोपरगावची स्वच्छता

कोपरगाव : कोपरगाव शहरातील साई सेवा भक्त मंडळाचे सर्व सदस्य म्हणजेच स्वच्छता भुतं. सप्टेंबर २०१४ पासून प्रत्येक रविवारी कोपरगाव शहरातील एका भागाची स्वच्छता करीत आहेत. या अखंडित सामाजिक उपक्रमाला नुकतेच २९४ आठवडे पूर्ण झाले आहेत.

कोपरगाव शहरात नगर परिषदेच्या स्वच्छता कर्मचाऱ्याकडून दररोज शहराची स्वच्छता केली जातेच; परंतु एवढे करूनही शहरात काही ठिकाणी कायमच मोठ्या प्रमाणात अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होऊ लागला. त्यातून अनेक साथींच्या आजाराचा प्रादुर्भाव वाढू लागला होता. त्यावेळी साई सेवा भक्त मंडळाच्या सर्व सदस्यांनी शहराची स्वच्छता झपाटल्याप्रमाणे सुरू केली. प्रत्येक रविवारी सकाळी ७ ते ९ या दोन तासात शहरातील एका भागाची पूर्णतः स्वच्छता करण्यास सप्टेंबर २०१४ मध्ये सुरुवात करण्यात आली. आजही हा उपक्रम सुरूच आहे.

या भक्त मंडळाच्या माध्यमातून दरवर्षी पंढरपूरच्या आषाढी एकादशीच्या यात्रेत भक्तांसाठी मेडिकल कॅम्प तसेच रेल्वेने बालाजी दर्शन यात्रेचे आयोजन करण्यात येते. या मंडळाने शहरात १०० वटवृक्षांची लागवड केलेली आहे. या मंडळाचे समन्वयक संजय काळे यांनी नोव्हेंबर २०२० मध्ये मंडळाच्या माध्यमातून संवत्सर येथे स्वतःच्या ५ एकर सुपीक जमिनीत दहा फूट उंचीचे ३११ वटवृक्षांची झाडे लावली आहेत. यंदा कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊनच्या काळात गरजवंतांना तसेच नगर- मनमाड महामार्गावरून जाणारे परप्रांतीय मजूर, पादचारी तसेच वाहनचालक यांनाही चहा, बिस्किट व नाष्टा देण्याचे सामाजिक कामही या मंडळाने केले आहे. या उपक्रमात मंडळाचे समन्वयक संजय काळे, मनोहर कृष्णानी, दादासाहेब उगले, अनिरुद्ध घोगरी, अक्षय इनामके, ॲड. मनोज कडू, बाजीराव गवारे, विजय सांगळे, संदीप बारवकर, महेंद्र अमृतकर, अशॊक कंदे यांच्यासह इतरही सदस्य ही स्वच्छता मोहीम सक्रियतेने राबवितात.

...............

कोपरगाव शहरातील वाढत्या अस्वच्छतेमुळे स्वच्छता करण्याचा हा उपक्रम हाती घेतला होता. यास सहा वर्षे पूर्ण झाली आहेत. यापुढेही अविरत हा उपक्रम सुरूच राहणार आहे.

- संजय काळे, समन्वयक- साई सेवा भक्त मंडळ, कोपरगाव.

..............

फोटो३१- साई सेवा भक्त मंडळ, कोपरगाव.

311220\img-20201231-wa0032.jpg

कोपरगाव येथील साई सेवा भक्त मंडळाचे समन्वयक संजय काळे यांच्यासमवेत सर्व स्वच्छता भुतं.

Web Title: They have been cleaning Kopargaon for 294 weeks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.