नगर शहरात लुटारूंचा धुमाकूळ : एटीएमकार्डात हेराफेरी करून चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2018 12:32 PM2018-07-05T12:32:56+5:302018-07-05T12:36:14+5:30
एटीएम कार्डात हेराफेरी करून बँक ग्राहकांचे पैसे लुटणारी टोळी नगर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत असून, या चोरट्यांनी दोन दिवसांत तिघांना ८५ हजार रूपयांना गंडा घातला. सहा ते सात जणांची ही टोळी अद्यापर्यंत पोलीसांच्या रडावर कशी येईना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
अहमदनगर : एटीएम कार्डात हेराफेरी करून बँक ग्राहकांचे पैसे लुटणारी टोळी नगर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कार्यरत असून, या चोरट्यांनी दोन दिवसांत तिघांना ८५ हजार रूपयांना गंडा घातला. सहा ते सात जणांची ही टोळी अद्यापर्यंत पोलीसांच्या रडावर कशी येईना असा प्रश्न उपस्थित होत आहे.
शहरातील भिस्तबाग येथील स्वरूप मोहनलाल सुतार (वय १९) हा मंगळवारी सकाळी चांदणी चौक येथून स्टेट बँकेकडे पैसे डिपॉजिट करण्यासाठी जात होता. पाळत ठेवलेल्या चोरट्यांनी स्वरूप याला हेरले. टोळीतील एकाने स्वरूप याच्याशी चर्चा करून मलाही पैसे डिपॉजिट करायचे आहेत. पण येथील एटीएम कार्ड बंद आहे. त्यामुळे दुसऱ्या एटीएम कार्डमधून मी आॅनलाईन मी पैसे डिपॉजिट करतो. माझ्याकडे रोख ५० हजार रूपये आहेत. हे पैसे तुमच्याकडे ठेवा आणि तुझ्याकडील २० हजार रूपये व एटीएम कार्ड माझ्याकडे द्या असे म्हणून तो स्वरूप याचे एटीएम कार्ड व २० हजार रूपये घेऊन गेला. स्वरूप याच्याकडे दिलेला ५० हजार रूपयांच्या बंडलमध्ये वरती एक पाचशे रूपयांची नोट तर खाली सर्व कागद जोडलेले होते. या चोरट्यांनी स्वरूप याच्या एटीएम कार्डमधून २२ हजार २०० रूपये काढून घेतले.
शहरातील एका विद्यालयात शिक्षण घेत असलेला रवीकुमार सुभाष राठोड (रा. तुळजापूर) हा बुधवारी पैसे काढण्यासाठी येथील स्टेट बँक चौकातील एटीएममध्ये आला होता. रवीकुमार याने मशीनमध्ये एटीएम टाकले मात्र त्याचे पैसे निघाले नाहीत. त्याच्या पाठीमागे उभा असलेल्या चोरट्यांने त्याच्या एटीएमचा चोरून कोड क्रमांक पाहिला होता. त्या चोरट्याने रवीकुमार याला मी पैसे काढून देतो असे म्हणून रवीकुमार याच्याकडून एटीएमकार्ड घेतले. तसेच त्याची नजर चुकवून त्याला त्याच बँकेचे दुसरे एटीम कार्ड दिले. त्यानंतर काही वेळातच रवीकुमार याच्या खात्यातून दुस-या एटीएममधून चोरट्यांनी २५ हजार रूपये काढून घेतले.रवीकुमार याची सर्वसामान्य परिस्थती असून, विद्यालयातील फी भरण्यासाठी त्याने हे पैसे बँकेत ठेवले होते.
या प्रकरणी स्वरूप सुतार व रवीकुमार राठोड यांनी भिंगार कॅम्प पोलीस सठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
चास येथील वाहनचालकाची फसवणूक
राठोड याच्या एटीएममधून पैसे काढून घेतल्यानंतर हेच चोरटे शहरातील संकेत हॉटेल जवळील एक्सेस बँकेच्या एटीएममध्ये गेले. तेथे वाहन चालक मधुकर ताताब्या गायकवाड (वयय ३८ रा.चास ता.नगर) हे पैसे काढण्यासाठी आले होते. गायकवाड हे पैसे काढत असताना एका चोरट्याने मी तुम्हाला पैसे काढून देतो असे म्हणून त्यांचे एटीएम कार्ड घेतले व त्याचा पीन क्रमांकमही घेतला़ गायकवाड यांना रविकुमार राठोड याचे एटीएम दिले. आणि गायकवाड यांच्या एटीएममधून १८ हजार रूपये काढून घेत पोबारा केला.
पैसे चोरण्याची अशी पद्धत
एटीएम कार्डांची फेराफेरी करून पैसे लुटणारी सहा ते सात जणांची स्थानिक टोळी आहे. शहरातील माळीवाडा, पुणे, स्टेट बँक चौक, सहकार सभागृह, जिल्हा परिषद आदी ठिकाणी असलेल्या एटीएम परिसरात हे चोरटे उभा राहतात. एखादा व्यक्ती एटीएम कार्डमध्ये पैसे काढण्यासाठी गेला तर पाठीमागून तीन ते चार जण सोबत जातात.तेथे थोडी गडबड करून बोलण्याचा प्रयत्न करतात. बोलण्याच्या नादात एटीएम कार्डची अदलाबदल करून पैसे काढून घेतात. हे काम अतीय चाणाक्ष पद्धतीने करतात. गेल्या सहा महिन्यांत अशा पद्धतीने अनेकांची फसवणूक झालेली आहे.
चोरटे सीसीटिव्हीत कैद
बँक ग्राहकांची फसवणूक करणारे चोरटे दोन एटीएम कार्डमधील सीसीटिव्ही कॅमे-यात कैद झाले आहे. पोलीसांनी हे फुटेज घेतले आहे.या चोरट्यांचा भिंगार कॅम्प पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरिक्षक संदीप पाटील यांच्यासह एक पथक शोध घेत आहे.