शेवगाव तालुक्यात चोरांचा धुमाकूळ सुरुच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:20 AM2021-01-23T04:20:22+5:302021-01-23T04:20:22+5:30

शेवगाव : तालुक्यात चोरांचा धुमाकूळ सुरू असून, गदेवाडी येथे शुक्रवारी पहाटे रोकड, बारा तोळे सोन्याचे दागिने, असा ३ लाख ...

Thieves continue to rage in Shevgaon taluka | शेवगाव तालुक्यात चोरांचा धुमाकूळ सुरुच

शेवगाव तालुक्यात चोरांचा धुमाकूळ सुरुच

शेवगाव : तालुक्यात चोरांचा धुमाकूळ सुरू असून, गदेवाडी येथे शुक्रवारी पहाटे रोकड, बारा तोळे सोन्याचे दागिने, असा ३ लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरी गेला.

याप्रकरणी शेवगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गत काही महिन्यात चोरीच्या घटना वाढल्या असून, तालुक्यातील विविध भागात चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे.

गदेवाडी येथील सीताबाई भानुदास कुलाडे (वय ५५) यांच्या राहत्या घरी चोरांनी शुक्रवारी पहाटे पावणेतीनच्या सुमारास घराचा कोयंडा तोडून ७५ हजार रुपयांच्या ३ तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, ८७ हजार ५०० रुपये किमतीचा साडेतीन तोळे वजनाचा गळ्यातील राणीहार, ७५ हजार रुपयांच्या तीन तोळ्याच्या तीन अंगठ्या, ५० हजारांचे दाेन तोळ्याचे सोन्याचे लॉकेट, २० हजारांचे आठ ग्रॅमचे कानातील झुंबर, ३० हजाराची रोकड असा एकूण ३ लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरीस गेला आहे.

याप्रकरणी सीताबाई कुलाडे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

पोलीस उपअधीक्षक सुदर्शन मुंडे, पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी घटनास्थळी भेट दिली. श्वान पथकाच्या सहायाने चाेरांचा माग काढण्याचा प्रयत्न झाला. मात्र, श्वान तेथेच घुटमळले. नगर येथील ठसेतज्ज्ञाने घटनास्थळी दाखल होऊन विविध वस्तुंवरील हाताचे ठसे घेतले आहेत.

गत काही महिन्यात चोऱ्यांच्या घटनेत वाढ झाली असून, चोरट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवून तीन ठिकाणी नाकाबंदी सुरू केली आहे. चोरांच्या टोळीचा लवकरच छडा लावून त्यांना गजाआड केले जाईल, असे पोलीस निरीक्षक प्रभाकर पाटील यांनी सांगितले.

Web Title: Thieves continue to rage in Shevgaon taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.