रेल्वे स्थानकाबाहेर पडताच चोरट्यांनी लुटले, मध्यरात्री पैसे आणि मोबाईल काढून घेतला, श्रीरामपुरातील घटना
By शिवाजी पवार | Published: December 6, 2023 12:55 PM2023-12-06T12:55:44+5:302023-12-06T12:55:54+5:30
Ahmednagar: जळगाव येथून लग्नाहून परतणाऱ्या श्रीरामपुरातील एक इसमाला रेल्वे स्थानकाबाहेर मध्यरात्री दोघा चोरट्यांनी लुटले. त्याच्याकडील १३ हजार रुपये व मोबाईल चोरट्यांनी काढून घेतला. अखेर आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले.
- शिवाजी पवार
श्रीरामपूर (जि. अहमदनगर) : जळगाव येथून लग्नाहून परतणाऱ्या श्रीरामपुरातील एक इसमाला रेल्वे स्थानकाबाहेर मध्यरात्री दोघा चोरट्यांनी लुटले. त्याच्याकडील १३ हजार रुपये व मोबाईल चोरट्यांनी काढून घेतला. अखेर आरडाओरडा केल्याने चोरटे पसार झाले.
शहरातील वार्ड क्रमांक एकमधील अतिथी कॉलनीतील रहिवासी नानासाहेब रंगनाथ चोंडके यांच्याबाबत हा प्रकार घडला. ते मावसभावाच्या लग्नाहून रेल्वेने शहरात आले. मध्यरात्री सव्वा बारा वाजता रेल्वे स्थानकावरून घराकडे निघाले असता तहसील कार्यालयाजवळ दोघे चोरटे चोंडके यांना आडवे झाले. त्यांनी मोटारसायकलने आडवी लावत रात्री कोठे निघाला अशी विचारणा केली. चोंडके यांनाच चोरीच्या उद्देशाने चालल्याचा आरोप करत दम भरला. आपण चोर नसून लग्नाहून रेल्वेने घरी परतल्याचे चोंडके म्हणाले. मात्र चोरट्यांनी त्यांच्या खिशातील १३ हजार रूपये व मोबाईल बळजबरीने काढून घेतला.
अखेर चोंडके यांनी आरडाओरडा केला असता चोरटे तेथून पळून गेले. चोंडके यांनी त्यांचा मोटारसायकल क्रमांक पाहिला. तो पोलिसांना देण्यात आला आहे. पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरून दोघा अनोळखी चोरटयांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहर पोलिस अधिक तपास करीत आहेत.