कोरोनाच्या संकटात चोरट्यांची किराणा मालावर संक्रात; हॅँड वॉशची चोरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 28, 2020 01:14 PM2020-03-28T13:14:37+5:302020-03-28T13:15:37+5:30
कोरोनाच्या जगव्यापी संकटात आता गावोगावी किराणा मालाच्या चोरीचेही संकट दबा धरून बसले आहे. शनिवारी (दि.२८ मार्च) पहाटे शिर्डीतील एक दुकान फोडून चोरट्यांनी किराणा मालासह हॅँड वॉशही चोरून नेले.
शिर्डी : कोरोनाच्या जगव्यापी संकटात आता गावोगावी किराणा मालाच्या चोरीचेही संकट दबा धरून बसले आहे. शनिवारी (दि.२८ मार्च) पहाटे शिर्डीतील एक दुकान फोडून चोरट्यांनी किराणा मालासह हॅँड वॉशही चोरून नेले.
नगर-मनमाड मार्गालगत जोशी हॉस्पिटलच्या समोर अशोक जगन्नाथ अहिरे यांचे श्रम साफल्य नावाचे किराणा मालाचे होलसेल दुकान आहे. शनिवारी मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी शटर तोडून या दुकानात चोरी करून जवळपास पाऊण लाखांचा माल लांबवला़ यात प्रत्येकी पंधरा किलो वजनाचे सोळा तेल डबे, वीस किलो तूप, काजू, बदाम, वेगवेगळ्या प्रकारचे चॉकलेटस, बिस्कीट व जवळपास पंचवीस हॅँड वॉशचाही समावेश आहे. याशिवाय दुकानाच्या गल्ल्यातील दहा ते पंधरा हजाराची रोकडही चोरीस गेली आहे. चोरट्यांनी हा माल नेण्यासाठी मोठ्या गाडीचा वापर केला असण्याची शक्यता आहे.
सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभर अनिश्चीत काळासाठी संचारबंदी असल्याने नागरिक तुटवड्याच्या भीतीने किराणा माल, धान्य आदींचा साठा करून ठेवत आहेत. त्यातच अनेक गुन्हेगारांच्या हातांनाही सध्या काही काम नसल्याने लहान-मोठ्या चो-या होण्याची शक्यता आहे. पण चोरी करतांना हँड वॉशही नेल्याने सध्याच्या संसर्गात चोरटेही स्वच्छतेचीही काळजी घेत असल्याचेही समोर आले आहे. पोलिसांनी घटनास्थळी भेट देवून पंचनामा केला असून पुढील तपास सुरू आहे. पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविण्याची मागणी माजी नगराध्यक्षा जयश्री थोरात व विष्णू थोरात यांनी केली आहे.
.......