चोराने चोरलेल्या दुचाकीचीच चोरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:15 PM2019-06-20T12:15:22+5:302019-06-20T12:15:38+5:30
एका चोरानी चोरी केलेली दुचाकी दुसऱ्या चोराने चोरी केल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना तपासात मिळाली.
श्रीगोंदा : एका चोरानी चोरी केलेली दुचाकी दुसऱ्या चोराने चोरी केल्याची माहिती श्रीगोंदा पोलिसांना तपासात मिळाली. तालुक्यातील देऊळगाव येथील दुचाकीचोर तुषार पवार याने तसा जबाब दिला आहे.
तुषार पवार याने एक चोरी केलेली दुचाकी दौंड रेल्वे स्टेशनजवळ लावली होती. तेथील दुसºया चोराने ती दुचाकी चोरून नेली, असे त्याने जबाबात म्हटले आहे. देऊळगाव येथील सेंटिंगचे काम करणारे रखमाजी पवार यांचा तुषार पवार मुलगा आहे. त्याचे वय अवघे १८ वर्षे आहे. केवळ चैनबाजी करण्यासाठी तुषारने दुचाकी चोरीचा फंडा शोधला. श्रीगोंदा येथील शनिचौक, बसस्थानक परिसरात लॉक न झालेल्या दुचाकी तो शोधायचा आणि चोरी करायचा. यामध्येही त्याने नव्या दुचाकी चोरण्यावरच भर दिला. या दुचाकी नंबर प्लेट काढून तो कमी भावात विकायचा. दोन महिन्यात गाडीची कागदपत्रे मिळतील, अशी बतावणी करून पैसे घ्यायचा.
आलेल्या पैशातून मित्रांसोबत चैनबाजी करायचा. सातारा, औरंगाबाद, टेंभूर्णी, करमाळा, कर्जत येथून त्याने तब्बल १८ हून अधिक दुचाकी दोन महिन्यात चोरी केल्या. त्याने त्यातून पाच ते सहा लाखांची कमाई केली. पैसे खर्च करत असल्यामुळे तो मित्रांमध्ये अल्प काळातच परिचित झाला.