दिवसाढवळ्या घराचे कुलूप तोडले; रोख रक्कम, दागिन्यांसह पावणे दोन लाख लंपास केले
By रोहित टेके | Published: May 13, 2023 08:24 AM2023-05-13T08:24:08+5:302023-05-13T08:24:22+5:30
कोपरगाव तालुक्यातील वारी, कान्हेगाव येथील घटना
कोपरगाव (जि. अहमदनगर ) : एका वस्तीवरील बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरातील कपाटात ठेवलेली दोन लाख रुपयांची रोख रक्कम, साठ हजार किमतीचे दागिने व पंधरा हजार रुपये किमतीच्या साड्या, ब्लाऊज, टोपी -टॉवेल असा एकूण २ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला आहे.
ही घटना कोपरगाव तालुक्यातील वारी येथे वारी -डोणगाव रस्त्यालगत असलेल्या एका वस्तीवर शुक्रवारी (दि.१२) दुपारी १२.४५ वाजताच्या सुमारास घडली आहे. याप्रकरणी नवनाथ पाराजी पवार (वय ५९, रा. वारी ता. कोपरगाव ) यांच्या फिर्यादीवरून कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी पुढील तपास पोलीस निरीक्षक वासुदेव देसले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र मस्के करीत आहे. दरम्यान याच दिवशी दुपारी कोपरगाव तालुक्यातील कान्हेगाव शिवारात वारी-संवत्सर रोडलगत असलेल्या भाऊसाहेब व्यंकटराव काजळे यांच्याही बंद घराचे कुलूप तोडुन घरात प्रवेश करुन कपाटाच्या लॉकरमधील रोख रकमेसह दागिन्यांची चोरी झाल्याची घटना घडल्याने ग्रामस्थ चांगलेच धास्तावले आहेत.