वाळू तस्करांच्या साडेतेरा लाखांच्या बोटी जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2020 12:36 PM2020-11-28T12:36:22+5:302020-11-28T12:36:53+5:30
कर्जत तालुक्यातील सिद्धटेक शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. गुरुवारी सायंकाळी पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने साडेतेरा लाख रुपयांच्या यांत्रिक बोटी जप्त केल्या.
कर्जत : कर्जत तालुक्यातील सिद्धटेक शिवारात अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक कारवाई हाती घेतली आहे. गुरुवारी सायंकाळी पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या पथकाने साडेतेरा लाख रुपयांच्या यांत्रिक बोटी जप्त केल्या.
सध्या जिल्ह्यात कोठेही वाळू साठ्यांचे लिलाव झालेले नाहीत. तरीही अवैधरीत्या बेसुमार वाळू उपसा सुरू असल्याचे वाळू उपशाचा ‘रात्रीस खेळ चाले’ या शीर्षकाखाली ‘लोकमत’ने २५ नोव्हेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध केले होते. त्यानंतर अवैध वाळू तस्करांची माहिती प्रशासन घेत होते. सिद्धटेक शिवारात भीमानदी पात्रात अवैध वाळू उपसा यांत्रिक बोटींच्या साह्याने सुरू असल्याची माहिती कर्जतचे पोलीस उपाधीक्षक अण्णासाहेब जाधव यांना मिळाली होती. त्यांनी कर्जत आणि श्रीगोंदा येथील पोलीस पथक घेऊन भीमानदी पात्रात धडक कारवाईची मोहीम राबविली.
पथकाने स्पीड बोटीच्या साहाय्याने भीमा नदीपात्रात उतरून अवैधरीत्या वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी जप्त केल्या. यात एकूण १३ लाख ५० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस नाईक अप्पासाहेब कोळेकर यांच्या फिर्यादीवरून कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जप्त करण्यात आलेल्या यांत्रिक बोट, त्यावरील इलेक्ट्रिक इंजिन मालक यांचा पोलीस शोध घेत आहेत.
पुढील तपास सोमनाथ दिवटे करीत आहेत. या कारवाईत उपविभागीय पोलीस अधिकारी अण्णासाहेब जाधव, सहायक पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे, हेड कॉन्स्टेबल टी. व्ही. सातपुते, पोलीस नाईक भारत गडकर, अप्पासाहेब कोळेकर, हृदय घोडके, इरफान शेख, संतोष साबळे, सागर जंगम, आदित्य बेल्हेकर, सुनील खैरे, मनोज लातूरकर, प्रकाश दंदाडे, योगेश भापकर, समीर सय्यद, अण्णा परीट, प्रकाश मांडगे, गणेश ठोंबरे, नय्युम पठाण आदींनी सहभाग घेतला.