भीतीने पडली प्रथा... धोंड्याच्या महिन्यात जावयांचे लाड नाहीच, धोंडे खाऊ न घालणारे पिंपळगाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2023 10:23 AM2023-08-01T10:23:00+5:302023-08-01T10:23:22+5:30

कुवतीप्रमाणे इतर भेटवस्तू दिल्या जातात. मात्र, पिंपळगाव उज्जैनी गाव या परंपरेला अपवाद ठरले आहे.

This is the custom... Pimpalgaon does not feed dhonde to the sons-in-law during the month of Dhondya | भीतीने पडली प्रथा... धोंड्याच्या महिन्यात जावयांचे लाड नाहीच, धोंडे खाऊ न घालणारे पिंपळगाव

भीतीने पडली प्रथा... धोंड्याच्या महिन्यात जावयांचे लाड नाहीच, धोंडे खाऊ न घालणारे पिंपळगाव

योगेश गुंड

अहमदनगर/केडगाव : अधिक मास सुरू असल्याने सध्या सगळीकडेच जावयांच्या धोंड्यांच्या जेवणाची धामधूम सुरू आहे. जावयांना धोंड्याचे गोडधोड जेवण देण्यासाठी सासुरवाडीच्या लोकांची सध्या लगबग सुरू आहे. त्याचे सोशल मीडियावरही सेलिब्रेशन फोटो सुरू आहेत. मात्र, नगर तालुक्यातील पिंपळगाव उज्जैनी गावात जावयांना धोंड्याचे जेवण खाऊ न घालण्याची जुनी प्रथा आजही कायम आहे.

आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगातही गावाने प्रथेचे कडक पालन केले आहे. अधिक मासात प्रत्येक सासुरवाडीत जावयांना धोंडे खाऊ घालण्याची परंपरा राज्यभर पाळली जाते. जावयाला घरी बोलावून गोडधोड जेवण देऊन किमती वस्तू भेट दिली जाते. लेकीचेही यानिमित्त माहेरची मंडळी आदरातिथ्य करतात. ग्रामीण भागात अधिक महिन्याला धोंड्याचा महिनाच संबोधले जाते. त्यात जावई नवा असला तर त्याची जास्तच बडदास्त ठेवली जाते.

कुवतीप्रमाणे इतर भेटवस्तू दिल्या जातात. मात्र, पिंपळगाव उज्जैनी गाव या परंपरेला अपवाद ठरले आहे. या गावाची अधिक मासातील प्रथा नेमकी उलटी आहे. या गावात कुणीच जावयांना धोंड्याचे जेवण खाऊ घालण्यासाठी घरी आमंत्रित करीत नाहीत. ही प्रथा कशी पडली व या प्रथेचे नेमके कारण काय?, याची माहिती गावातील कोणालाही सांगता येत नाही इतकी ही परंपरा जुनी आहे. या गावातील लोकांशी चर्चा केल्यानंतर काही बाबी समोर आल्या.

या गावात कधी काळी कोणी आपल्या जावयांना अधिक मासात धोंडे खाऊ घातले आणि जावयाच्या घरी दुर्घटना घडली, असा अनुभव जुन्या काळात अनेकांना आला. यामुळे धोंडे जेवण देण्याच्या प्रथेमुळेच या दुर्घटना घडत आहेत, असा गावकऱ्यांचा समज झाला. काहींच्या मते अधिक मासात जावयांना धोंडे खाऊ घातल्यास गावात रोगराई सुरू झाली. यामुळे अनेकांचा जीव गेला. यामुळे गावाने जावयांना अधिक मासात धोंड्यांचे जेवण खाऊ घालण्याची प्रथाच एकमुखाने बंद केली, असे सांगण्यात आले. 

सरपंच म्हणतात...

आमच्या गावात अधिक मासात जावयांना धोंडे खाऊ न घालण्याची प्रथा आहे. सर्व गावकरी या प्रथेचे पालन करतात. ही प्रथा कधीपासून सुरु झाली हे कोणालाच ठाऊक नाही. परंपरेनुसार गावकरी त्या प्रथेचे पालन करतात. आजही ही प्रथा आम्ही पाळतो.
- मोनिका आढाव, सरपंच, पिंपळगाव उज्जैनी

Web Title: This is the custom... Pimpalgaon does not feed dhonde to the sons-in-law during the month of Dhondya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.