यंदा खरिपाच्या क्षेत्रात १५ टक्के वाढ प्रस्तावित, कृषी विभागाकडून खते, बियाणांचे नियोजन
By चंद्रकांत शेळके | Published: May 16, 2024 08:19 PM2024-05-16T20:19:34+5:302024-05-16T20:20:27+5:30
सोयाबीनचा पेरा दुपटीने वाढण्याची शक्यता
चंद्रकांत शेळके/अहमदनगर : सध्या कमी-अधिक पडणारा अवकाळी पाऊस व यंदा हवामान खात्याने समाधानकारक पावसाचा वर्तवलेला अंदाज लक्षात घेता कृषी विभागाने खरिपाचे नियोजन केले आहे. यंदा खरिपाच्या क्षेत्रात मागील वर्षीपेक्षा १५ टक्के वाढ अपेक्षित असून, ७ लाख हेक्टर क्षेत्र खरिपासाठी प्रस्तावित करण्यात आले आहे. यात सोयाबीनचा पेरा दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागाने बियाणे व खते मुबलक उपलब्ध होतील, याची खबरदारी घेतली आहे.
जिल्ह्यात १५ जून ते १५ ऑगस्ट हा खरीप हंगाम पेरणीचा कालावधी असून जिल्ह्याच्या भौगोलिक रचना आणि होणाऱ्या पर्जन्यमानानुसार खरीप हंगामातील पिकांची निवड झालेली आहे. यात दक्षिण जिल्ह्यात प्रामुख्याने कडधान्य पिके घेतली जातात. तर उत्तरेतील अकोले आणि पारनेर तालुका वगळता उर्वरित सर्व तालुक्यांत नगदी पीक म्हणून सोयाबीन, कपाशीचे पीक घेण्यात येते. नगर जिल्हा हा प्रामुख्याने रब्बी हंगामाचा जिल्हा आहे. मात्र, अलीकडच्या काही वर्षांत जिल्ह्यात खरिपाच्या क्षेत्रात लक्षणीय वाढ झालेली आहे.
खरीप हंगामात कपाशी आणि सोयाबीन पिकाचे क्षेत्र वाढत असून, या दोन पिकांमुळे कमी कालावधीत शेतकऱ्यांना आर्थिक फायदा होतो. याशिवाय भात, बाजरी, मका, तूर, मूग, उडीद या पिकांनाही शेतकरी पसंती देतात.
जिल्ह्यात सरासरी ५ लाख हेक्टरवर खरिपाच्या पेरण्या होतात. मात्र, गेल्या तीन वर्षांत त्यात वाढ होत आहे. मागील वर्षी ५ लाख ८६ हजार हेक्टरवर खरिपाची लागवड झाली होती. यंदा त्यात १५ ते १७ टक्के वाढ होऊन ७ लाख २ हजार हेक्टरवर खरिपाच्या लागवडीची शक्यता आहे. त्यामुळे बियाणे व खतांचीही आगाऊ मागणी करण्यात आली आहे.
दीड लाख टन खत शिल्लक
सन २०२४ च्या खरीप हंगामासाठी कृषी विभागाने एकूण २ लाख ८० हजार टन खताची मागणी शासनाकडे केली. त्यातील २ लाख ३२ हजार आवंटन मंजूर झाले आहे. दरम्यान, यात मागील वर्षीची शिल्लक १ लाख २४ हजार ७२५ टन आहे. १ एप्रिलपर्यंत २० हजार ९०० टन खत प्राप्त झाले. आतापर्यंत त्यातून ४ हजार ५२६ टन खतांची विक्री झाली. त्यामुळे सध्या १ लाख ४७ हजार ५७२ टन खते उपलब्ध आहेत. तर उर्वरित खते मागणीनुसार उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाकडून मिळाली.
सोयाबीन बियाणाची अधिकची मागणी
पेरा वाढणार असल्याने कृषी विभागाने यंदा बियाणांची अधिकची मागणी नोंदवली आहे. यंदा खरिपासाठी ८२ हजार ८४९ क्विंटल बियाणांची मागणी करण्यात आली असून यात ४९ हजार ८७५ क्विंटल बियाणे सोयाबीनचे आहे. त्याखालोखाल मक्याचे १३ हजार २००, भाताचे ५ हजार ५४०, बाजरीचे २९७५, तर कपाशीचे बियाणे अडीच हजार क्विंटल असेल.