शेतकरी संघटनेच्या रडारवर आता थोरात कारखाना; ऊस दरासाठी संगमनेरमध्ये आंदोलनाचा इशारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 27, 2017 01:50 PM2017-12-27T13:50:21+5:302017-12-27T13:51:09+5:30
थोरात सहकारी साखर कारखान्याने केवळ २३०० रुपये उचल दिली. त्यामुळे ऊसउत्पादक शेतक-यांमध्ये असंतोष आहे. १ जानेवारीपर्यंत उसाला पहिली उचल २ हजार ५५० रुपये इतकी न दिल्यास थोरात कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी दिला.
संगमनेर : सांगली, सातारा, कोल्हापूर भागातील सहकारी साखर कारखान्यांनी उसाला पहिली उचल २८०० ते ३१०० रुपये दिली. राज्यात सहकार क्षेत्रात नावलौकिक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने २०१७-१८ या गळीत हंगामासाठी केवळ २३०० रुपये उचल दिली. त्यामुळे ऊसउत्पादक शेतक-यांमध्ये असंतोष आहे. १ जानेवारीपर्यंत उसाला पहिली उचल २ हजार ५५० रुपये इतकी न दिल्यास थोरात कारखान्याविरोधात तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने प्रदेशाध्यक्ष दशरथ सावंत यांनी दिला.
कारखान्याचे अध्यक्ष अॅड. माधवराव कानवडे यांना मंगळवारी निवेदन देण्यात आले. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दशरथ सावंत बोलत होते. थोरात सहकारी साखर कारखाना राज्यात अग्रेसर आहे. परंतु इतर दुबळ्या कारखान्याच्या तुलनेत या कारखान्याने पहिली उचल अडीच हजार रुपयांपेक्षा कमी दिली. प्रवरानगर व संगमनेर येथील सहकारी साखर कारखाने जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बाबतीत दबाब तंत्राचा वापर करतात. त्यामुळेही परिणामी त्यांनाही उसाचा पहिली उचल कमी द्यावी लागते. कोल्हापूर भागातील शेतकºयांनी साखर सम्राटांना धारेवर धरून उसाला एफ.आर.पी. प्रमाणे पहिली उचल मिळवून दिली. असेच आंदोलन येथे उभे करावे लागणार आहे. थोरात कारखान्याने नव्या कारखान्याच्या उभारणीसाठी ३०० कोटींच्या आसपास गुंतवणूक केली. मात्र, शेतकºयांच्या घामाला दाम देण्यासाठी तुम्ही कोणती गुंतवणूक केली? असा सवाल सावंत यांनी केला.
निवेदनावर दीपक वाळे, रामराव गुंजाळ, शिवाजी वाळे, दीपक थोरात, वैभव कर्पे, रामचंद्र डुबे, पाटीलबुवा सावंत, दीपक काकड, मनोहर मालुंजकर, अजिंक्य डोंगरे, अरुण थोरात, अरविंद देशमुख, भास्कर नाईकवाडी, नानासाहेब थोरात, सोमनाथ खताळ, गुलाब कडलग आदींच्या सह्या आहेत.
शिक्षणसंस्था शेतक-यांच्या नावावर करा
राज्यातील साखरसम्राटांनी उसाच्या पैशांवर शिक्षणसंस्था काढल्या. शेतक-यांच्या उसाला जर हमीभाव देता येत नसेल, तर तुमच्या शिक्षणसंस्था शेतक-यांच्या मालकीच्या करा. या संस्थांमधून मिळणा-या पैशांतून आम्ही उसाला एफआरपीप्रमाणे भाव देऊन साखर कारखाने चालवून दाखवू. आमचा कुणालाही विरोध नाही. सहकार टिकविणे हा आमचा मूळ उद्देश आहे. कारखान्याच्या व्यवस्थापनाने सर्व शेतक-यांचा प्रातिनिधीक भावनांचा सहानभूतिपूर्वक विचार करावा, असेही दशरथ सावंत यांनी सांगितले.