थोरात, विखे कारखान्याची निवडणूक जाहीर; वेगवेगळ्या दिवशी मतदान
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 22:45 IST2025-04-01T22:45:03+5:302025-04-01T22:45:23+5:30
अर्ज दाखल करण्यास उद्यापासून सुरुवात : विखे कारखान्यासाठी ९ ला, तर थोरातसाठी ११ मे रोजी मतदान

थोरात, विखे कारखान्याची निवडणूक जाहीर; वेगवेगळ्या दिवशी मतदान
लोकमत न्यूज नेटवर्क
संगमनेर : सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाची निवडणूक मंगळवारी जाहीर झाली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यास गुरुवारपासून प्रारंभ होत आहे. विखे कारखान्यासाठी ९, तर थोरात कारखान्यासाठी ११ मे रोजी मतदान होणार आहे. विखे कारखानाच्या निवडणुकीचा कार्यक्रम आज सायंकाळपर्यंत जाहीर होईल, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली.
सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखान्याच्या संचालक मंडळासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी ३ ते ९ एप्रिलदरम्यान मुदत असून, ११ मे रोजी मतदान होणार आहे, अशी माहिती प्रांताधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.
थोरात सहकारी साखर कारखान्याची प्रारूप मतदार यादी २५ फेब्रुवारीला, तर अंतिम मतदार यादी १९ मार्चला प्रसिद्ध करण्यात आली आहे. संचालकांच्या २१ जागांसाठी ही निवडणूक होत आहे. यासोबतच पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाचीही निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या ३ एप्रिलपासून विखे पाटील कारखान्याची निवडणूक प्रक्रिया सुरू होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अंतिम मुदत ९ एप्रिल असून, ९ मे रोजी मतदान घेण्यात येणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जिल्ह्यातील दोन्ही प्रबळ नेत्यांच्या अधिपत्याखालील सहकारी साखर कारखान्यांच्या निवडणुका एकाचवेळी जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापणार आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व माजी आमदार बाळासाहेब थोरात हे एकमेकांचे पारंपरिक विरोधक आहेत. विधानसभा निवडणुकीत हा विरोध आणखी तीव्र झाला होता. त्याची झलक साखर कारखान्यांच्या निवडणुकीतही पाहायला मिळणार आहे. त्यामुळे या दोन्ही कारखान्यांच्या निवडणुका चांगल्याच गाजण्याची शक्यता आहे.
‘थोरात’च्या २१ जागांसाठी निवडणूक
सर्वसाधारण गटाच्या मतदारसंघ क्रमांक एकमध्ये गट क्रमांक १ ते ५ मध्ये १५ प्रतिनिधी, मतदारसंघ क्रमांक दोनमध्ये उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक संस्था व पणन संस्था १ प्रतिनिधी, अनुसूचित जाती/ अनुसूचित जमाती प्रतिनिधी मतदारसंघात १ प्रतिनिधी, दोन महिला प्रतिनिधी, इतर मागासवर्ग मतदारसंघात एक प्रतिनिधी, भटक्या विमुक्त जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी मतदारसंघात एक, अशा एकूण २१ जागा आहेत. निवडणुकीकरिता राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाचे सचिव अशोक गाडे यांनी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून तहसीलदार धीरज मांजरे यांची नियुक्ती केली आहे.
थोरात कारखान्याचा असा आहे निवडणूक कार्यक्रम
- अर्ज दाखल करणे : ३ ते ९ एप्रिलदरम्यान सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत.
- प्राप्त अर्ज प्रसिद्ध करणे : ३ ते ९ एप्रिलदरम्यान (दुपारी ४ वाजता).
अर्जांची छाननी : ११ एप्रिल सकाळी ११ ते छाननी संपेपर्यंत.
-विधिग्राह्य अर्जांची सूची प्रसिद्ध करणे : १५ एप्रिल सकाळी ११ वा.
- अर्ज माघार : १५ ते २९ एप्रिल सकाळी ११ ते दुपारी ३ पर्यंत.
- अर्जांची यादी प्रसिद्ध व चिन्ह वाटप : २ मे रोजी सकाळी ११ वा.
-मतदानाची तारीख व वेळ : ११ मे सकाळी ८ ते दुपारी ५ वाजेपर्यंत (स्थळ नंतर घोषित करण्यात येईल.)
-मतमोजणी : १२ मे सकाळी ९ वाजेनंतर (स्थळ नंतर घोषित करण्यात येईल.)