विखेंच्या विरोधात थोरातांचे पुतणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2019 01:12 PM2019-10-05T13:12:44+5:302019-10-05T13:13:52+5:30
शिर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश थोरात यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरेश थोरात हे काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पुतणे आहेत़ त्यामुळे शिर्डीत विखे विरूध्द थोरात असा सामना होणार आहे़
लोणी : शिर्डी विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या वतीने संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य सुरेश थोरात यांनी शुक्रवारी उमेदवारी अर्ज दाखल केला. सुरेश थोरात हे काँगे्रसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांचे पुतणे आहेत़ त्यामुळे शिर्डीत विखे विरूध्द थोरात असा सामना होणार आहे़
शुक्रवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त एकनाथ गोंदकर, ज्ञानेश्वर वर्पे यांच्या उपस्थितीत सहाय्यक निवडणूक अधिकारी गोविंदराव शिंदे यांच्याकडे सुरेश थोरात यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. सुरेश थोरात हे जोर्वे गावचे रहिवासी आहेत. जोर्वे या गावासह संगमनेर तालुक्यातील २६ गावे शिर्डी विधानसभा मतदारसंघात येतात. शिवाय सुरेश थोरात हे बाळासाहेब थोरात यांचे चुलत पुतणे आहेत. शिर्डी मतदारसंघात राजेंद्र पिपाडा हे राधाकृष्ण विखे यांचे विरोधक म्हणवले जात होते़ मात्र, यावेळी ते दोघेही एकाच पक्षात आहेत़ त्यामुळे थोरातांनी त्यांचा प्रभाव असलेल्या कार्यक्षेत्रातील उमेदवार दिला आहे़