‘त्या’ निविदांच्या छाननीसाठी महापालिकेत खलबते; सर्वपक्षीय नगरसेवकांची हजेरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 01:19 PM2020-06-02T13:19:00+5:302020-06-02T13:20:45+5:30
जिल्हास्तर व दलितेतर कामांच्या निविदांची छाननी करण्याचा आग्रह धरत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी महापालिकेत हजेरी लावली. महापौरांच्या उपस्थितीत अधिकारी व नगरसेवकांत बंद दरवाजाआड झालेल्या चर्चेनंतर तातडीने छाननी करून निविदा अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांना सादर करण्यात आल्या.
अहमदनगर : जिल्हास्तर व दलितेतर कामांच्या निविदांची छाननी करण्याचा आग्रह धरत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी महापालिकेत हजेरी लावली. महापौरांच्या उपस्थितीत अधिकारी व नगरसेवकांत बंद दरवाजाआड झालेल्या चर्चेनंतर तातडीने छाननी करून निविदा अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांना सादर करण्यात आल्या.
जिल्हास्तर व दलितेतर योजनेंतर्गत महापालिकेत साडेआठ कोटींचा निधी मंजूर आहे. या निधीतून २९ कामे प्रस्तावित करण्यात आली आहे. ही कामे करण्यासाठी बांधकाम विभागाने निविदा मागविल्या़ निविदा मागविताना डांबर प्लॅन्टची अट घालण्यात आली. ठेकेदारांनी तक्रार केल्यानंतर ही अट रद्द करण्यात आली. त्यामुळे या निविदा सुरुवातीपासूनच वादग्रस्त ठरल्या.
दरम्यान कोरोनामुळे निविदाही लॉकडाऊन करण्यात आल्या. त्यामुळे या निविदांची पुढील कार्यवाही झाली नाही. त्यात सरकारने निधी परत मागविल्याने नगरसेवक चांगलेच आक्रमक झाले होते. परंतु, प्रशासनाकडून कुठलीच कार्यवाही होत नसल्याने अखेर काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपाच्या नगरसेवकांनी महापौरांकडे तक्रार केली.
या पार्श्वभूमीवर महापौर बाबासाहेब वाकळे यांनी सोमवारी सर्वच पक्षांच्या नगरसेवकांची बैठक बोलविली. या बैठकीत नगरसेवकांनी प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. बराचवेळ झालेल्या चर्चेनंतर तातडीने छाननी करण्याचे काम हाती घेण्यात आले. दुपारपर्यंत तांत्रिक लिफाफे उघडून कागदपत्रांची पूर्तता करण्याबाबत संबंधित ठेकेदारांना कळविण्यात आले आहे. निविदा अंतिम मंजुरीसाठी सायंकाळी आयुक्तांना सादर करण्यात आल्या़ प्रस्ताव आयुक्तांना सादर केल्याची खात्री करून नगरसेवक निघून गेले. यापूर्वी सर्वच पक्षांच्या स्वतंत्र बैठका पार पडल्या.
जिल्हास्तर व दलितेतर निविदांची छाननी करण्यासाठी लॉकडाऊनमुळे वेळ मिळाला नाही. त्यात शासनाचे वेगवेगळे आदेश प्राप्त झाले़ त्यामुळे विलंब झाला. सोमवारी छाननी करून निविदा अंतिम मंजुरीसाठी आयुक्तांना सादर करण्यात आल्या आहेत़, असे प्रभारी शहर अभियंता सुरेश इथापे यांनी सांगितले.