"अडीच वर्षात मंत्रालयात ज्यांना जाता आले नाही, त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर बोलू नये"
By अरुण वाघमोडे | Published: September 21, 2022 01:59 PM2022-09-21T13:59:24+5:302022-09-21T14:00:24+5:30
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जातात म्हणून काहींना आक्षेप आहे, परंतु मागील अडीच वर्षात मुख्यमंत्रीपदी असताना जे फक्त दोन-तीन वेळा तेथून जवळच असलेल्या मंत्रालयात गेले, अशांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर बोलू नये
अहमदनगर:
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जातात म्हणून काहींना आक्षेप आहे, परंतु मागील अडीच वर्षात मुख्यमंत्रीपदी असताना जे फक्त दोन-तीन वेळा तेथून जवळच असलेल्या मंत्रालयात गेले, अशांनी मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली वारीवर बोलू नये, असा सल्ला उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी बुधवारी येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला. अडीच वर्षांपूर्वीच आम्ही उद्धव ठाकरे यांना सर्वांना भेटण्यासाठी वेळ द्या म्हणून सांगत होतो, परंतु त्यावेळी त्यांनी ऐकले नाही. आता थेट गट प्रमुखांचे मेळावे घेतात याचा अर्थ, आम्ही जसे जनतेत जात आहोत, त्या प्रमाणे ते वागू लागले आहेत, असा दावाही देसाई यांनी केला.
नगरमध्ये मुख्यमंत्री शिंदे समर्थकांचा हिंदू गर्व गर्जना मेळावा नक्षत्र लॉन मध्ये झाला. त्याआधी पत्रकारांशी बोलताना देसाई यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. राज्यभरातील जनता मुख्यमंत्री शिंदे समवेत आहे, त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी आमच्या कामास आशीर्वाद द्यावा. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जसे सर्वांना बरोबर घेऊन जायचे त्या पद्धतीने उद्धव ठाकरे यांनीही आमच्या कामास आशीर्वाद द्यावा, असे देसाई म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार दिल्लीला जात असले तरी तेथे केंद्र सरकारकडून राज्याच्या विकासासाठी जास्त निधी आणण्याच्या प्रयत्नात आहेत. मध्यंतरी निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रासाठी 19000 कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्री शिंदे यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे केली आहे. पंतप्रधानांनीही महाराष्ट्रातील कोणताही प्रकल्प रखडू घेणार नाही व त्याला निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही दिली आहे. मागील अडीच वर्षात मागचे मुख्यमंत्री दिल्ली तर सोडाच, पण मुंबईत असलेल्या मंत्रालयात जात नव्हते. त्याच्या आता आम्ही खोलात जाणार नाही, पण एकनाथ शिंदे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री असल्याने केंद्र सरकारचा त्यांना पाठिंबा आहे, असेही देसाई म्हणाले.