"काँग्रेस मुक्त भारत बनविणारे मुक्त होतील, पण...", अशोक गहलोतांचा भाजपवर निशाणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2022 05:13 PM2022-09-23T17:13:12+5:302022-09-23T17:14:23+5:30
Ashok Gehlot : स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.
संगमनेर : काँग्रेस मुक्त भारत बनविणार असे बोलणारे मुक्त होतील; पण देशात काँग्रेस कायम राहील. देशातील प्रत्येक गावात काँग्रेस आहे. धर्माच्या नावावर पाकिस्तानची निर्मिती झाली. आता हिंदू धर्माच्या नावावर देश बनविण्याचे काम सुरू आहे. पाकिस्तानचे तुकडे झाल्याचे आपल्या समोर आहे, असे राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी भाजपवर निशाणा साधला.
स्वातंत्र्यसैनिक सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात, हरित क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. शुक्रवारी (दि.२३) येथील शेतकी संघाच्या प्रांगणात प्रेरणा दीन व पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजीमंत्री छगन भुजबळ होते. काँग्रेस नेते, माजीमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे आदी यावेळी उपस्थित होते.
अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने दरवर्षी पुरस्कारांचे वितरण करण्यात येते. सहकार, साहित्य, समाजसेवा, पर्यावरण, माध्यम क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल यंदाचा स्वातंत्र्यसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. आण्णासाहेब हरी साळुंखे यांना तर कृषी, शिक्षण, समाजसेवा, पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल दिला जाणारा यंदाचा डॉ. अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार पर्यावरण तज्ज्ञ डॉ. सुधीर जगन्नाथ भोंगळे यांना तसेच सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सेवाभावी संस्थेच्या वतीने सहकारातील नेतृत्व पुरस्कार माजीमंत्री तथा विलासनगर (लातूर) येथील मांजरा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिलीपराव दगडोजीराव देशमुख यांना प्रदान करण्यात आला.