ज्यांना सर्वांनी नाकारलं त्यांना ‘मानवसेवा’ने स्वीकारलं; लॉकडाऊन काळात १६ बेघर मनोरुग्णांना निवारा
By अरुण वाघमोडे | Published: June 7, 2020 01:58 PM2020-06-07T13:58:44+5:302020-06-07T13:59:36+5:30
रस्त्यावर भटकंती करणा-या बहुतांशी मनोरुग्ण, मतिमंद यांना कोरोनाच्या महामारीमुळे नातेवाईकांसह समाजानेही नाकारले. कुणाचाच आधार नसलेल्या या मनोरुग्णांना मानवसेवा प्रकल्पात स्वीकारून त्यांना निवारा दिला. लॉकडाऊन काळात १६ मनोरुग्णांना मानवसेवा पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यात ९ महिला व ७ पुरुषांचा समावेश आहे.
अहमदनगर : रस्त्यावर भटकंती करणा-या बहुतांशी मनोरुग्ण, मतिमंद यांना कोरोनाच्या महामारीमुळे नातेवाईकांसह समाजानेही नाकारले. कुणाचाच आधार नसलेल्या या मनोरुग्णांना मानवसेवा प्रकल्पात स्वीकारून त्यांना निवारा दिला. लॉकडाऊन काळात १६ मनोरुग्णांना मानवसेवा पुनर्वसन केंद्रात दाखल करण्यात आले असून त्यात ९ महिला व ७ पुरुषांचा समावेश आहे.
नगर तालुक्यातील अरणगाव येथे श्री अमृतवाहिनी ग्रामविकास मंडळ या संस्थेच्यावतीने गेल्या बारा वर्षांपासून मनोरुग्णांसाठी मानवसेवा हा प्रकल्प चालविला जात आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आजपर्यंत ५७६ बेघर मनोरुग्ण महिला व पुरुषांना उपचार देऊन त्यांच्या कुटुंबात परत पाठविले आहे. सध्या या प्रकल्पात ३० बेघर मनोरुग्ण उपचार घेत आहेत. कोरोनाच्या काळात रस्त्यावर आढळून आलेल्या मनोरुग्णांना कोठे दाखल करावयाचे हा प्रश्न पोलिसांसमोर होता. अशा परिस्थितीत मानवसेवा प्रकल्पाने मनोरुग्ण व्यक्तींना निवारा देत त्यांच्यावर उपचार सुरू केले.
मनोरुग्णांसाठी शासकीय निवारा नाही
महाराष्ट्रात मनोरुग्णांसाठी पुणे, ठाणे व नागपूर असे तीनच ठिकाणी हॉस्पिटल आहेत. या हॉस्पिटलची मर्यादाही प्रत्येकी १७०० इतकी आहे. त्यामुळे नगरमध्ये मनोरुग्णांसाठी कार्यरत असलेल्या खाजगी संस्था महत्त्वपूर्ण ठरत आहेत. सध्या कोरोनाच्या काळात रस्त्यावर आढळून येणा-या मनोरुग्णांना पोलीस याच संस्थेत दाखल करीत आहेत.
नेपाळचा मतिमंद युवक कुटुंबात परतला सुखरूप
कोतवाली पोलिसांना केडगाव बायपास येथे ३० मार्च रोजी लॉकडाऊनकाळात एक बेवारस मतिमंद युवक (वय १८) आढळून आला होता. पोलिसांनी या युवकाला मानवसेवा प्रकल्पात दाखल केले होते. संस्थेने दीड महिना या युवकाला उपचार देत काळजी घेतली. या युवकाला परत त्याच्या कुटुंबात पोहोच करण्यासाठी संस्थेच्यावतीने प्रयत्न करण्यात आले. अखेर या मतिमंद युवकाची ओळखही समोर आली. दीपक थापा असे नाव असलेल्या युवकाला त्याच्या कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. दीपक हा भोसरी एमआयडीसी येथे राहणारा होता.
रस्त्यावरील बेघर, निराधार मनोरुग्णांच्या सेवेसाठी गेल्या बारा वर्षांपासून कार्यरत असलेल्या मानवसेवा प्रकल्पाला मदतीची गरज आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे संस्थेला मिळणारा मदतीचा ओघ कमी झाला आहे. संस्थेकडील अन्नधान्य, किराणा, औषधे आणि इतर अत्यावश्यक वस्तुंचा साठा कमी झाला आहे. हे कार्य पूर्णत: लोकसहभागातून चालते. समाजातील दानशूर व्यक्तींनी संस्थेला मदत करावी.
-दिलीप गुंजाळ, संस्थापक, मानवसेवा प्रकल्प.