शेतकऱ्यांच्या डोक्यावर तीन हजार कोटी कर्जाचा डोंगर

By Admin | Published: May 10, 2017 01:40 PM2017-05-10T13:40:41+5:302017-05-10T13:40:41+5:30

बळीराजाला शेतातील उत्पादकता वाढविण्यास मदत व्हावी, या हेतूने शासनाच्या निर्देशानुसार विविध बँकाकडून जिल्ह्यात मार्चअखेर ३३६५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले.

Thousands of debt of farmers on the heads of farmers | शेतकऱ्यांच्या डोक्यावर तीन हजार कोटी कर्जाचा डोंगर

शेतकऱ्यांच्या डोक्यावर तीन हजार कोटी कर्जाचा डोंगर

आॅनलाइन लोकमत
अहमदनगर, दि़ १० - बळीराजाला शेतातील उत्पादकता वाढविण्यास मदत व्हावी, या हेतूने शासनाच्या निर्देशानुसार विविध बँकाकडून जिल्ह्यात मार्चअखेर ३३६५ कोटींचे कर्जवाटप करण्यात आले. परंतु दुष्काळी स्थिती, शेतमालाचे घसरलेले दर यामुळे कर्जफेड करायची कशी या विवंचनेत शेतकरी सापडला आहे.
नगर जिल्ह्यातील बहुतांश तालुके दुष्काळी आहेत. त्यामुळे पाण्याअभावी येथील शेती कायमच तोट्यात असते. शेतकऱ्यांना हातभार लागावा म्हणून शासन विविध राष्ट्रीयीकृत बँका, ग्रामीण बँका, तसेच जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून खरीप व रब्बी पिकांसाठी शेतकऱ्यांना कर्जपुरवठा करते. नगर जिल्ह्यातही विविध बँकांमार्फत तब्बल ३३६५ कोटींचे कर्ज शेतकऱ्यांच्या जमिनीवर देण्यात आले आहे. वर्षानुवर्षांचा दुष्काळ, तसेच यावर्षी शेतमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकऱ्याला कर्जाची परतफेड करण्यात मोठ्या अडचणी आल्या. काही शेतकऱ्यांचा तर उत्पादन खर्चही निघाला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले. यंदाही कर्जमाफीची टूम उठली, काही दिवस शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या. मात्र कर्जमाफी होणार नसल्याचे स्पष्ट होताच पुन्हा चेहरे पडले. त्यामुळे आता शासनाने एक तर कर्जमाफी द्यावी, नाहीतर शेतमालाला हमीभाव द्यावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

मार्च २०१७ अखेरचे पीककर्ज वाटप
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक - १७१७ कोटी
एकूण राष्ट्रीयकृत बँका- १६३९ कोटी
ग्रामीण बँका - ८.६५ कोटी

दुहेरी फटका
शेतकऱ्यांची कामधेनू असलेल्या नगर येथील जिल्हा सहकारी बँकेची आर्थिक स्थिती राज्यात सर्वोत्तम आहे. नगरच्या शेजारील जिल्ह्यांतील बँका एकीकडे अडचणीत येत असताना नगर जिल्हा बँक मात्र मजबूत राहिली. त्यामुळे बँकेकडून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात कर्जवाटप केले जाते. परंतु यंदा कर्जमाफीच्या आशेने नगर जिल्हा बँकेच्या कर्जवसुलीतही मोठी घट झाली. कर्जमाफी होणार म्हणून अनेक शेतकऱ्यांनी मुदतीत कर्जफेड केली नाही, परिणामी त्यांना व्याजातील सवलत मिळाली नाही. आता कर्ज थकीत असल्याने व्याजाचा भुर्दंड भरावा लागेल, शिवाय नवीन कर्जही मिळणार नाही. कर्जमाफीच्या अफवेने असा दुहेरी फटका शेतकऱ्यांना बसला.

Web Title: Thousands of debt of farmers on the heads of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.