बंदी घालूनही यात्रेत जमले हजारो भाविक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:21 AM2021-04-01T04:21:27+5:302021-04-01T04:21:27+5:30
केडगाव : गर्दी होऊ नये यासाठी यात्रा रद्द करण्यात आली. मात्र या बंद न जुमानता गावच्या ग्रामदैवताच्या दर्शनासाठी हजारोंची ...
केडगाव : गर्दी होऊ नये यासाठी यात्रा रद्द करण्यात आली. मात्र या बंद न जुमानता गावच्या ग्रामदैवताच्या दर्शनासाठी हजारोंची गर्दी जमा झाली. यातून अकरा जणांना कोरोनाची लागण झाल्याचा प्रकार देहरे (ता.नगर) येथे घडला.
देहरे गावात मालोबा बालोबा व मांगीरबाबा यांची यात्रा भरते. ग्रामदैवत असल्याने यात्रेला गर्दी होते. यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन प्रशासनाने यात्रेवर बंदी घातली. या संदर्भात देहरे येथे दोन दिवसांपूर्वी गावकरी व प्रशासन यांच्यात बैठक झाली. प्रशासनाने यात्रा करण्यास बंदी घातली. मात्र या बंदीला न जुमानता हजारो भाविक गावात जमा झाले. यात्रेसाठी ग्रामपंचायतीने ५० लोकांची परवानगी घेतली होती. मात्र या यात्रेत हजार ते दीड हजार ग्रामस्थानी हजेरी लावली. त्यानंतर जिल्हा परिषद आरोग्य केंद्रात २१ नागरिकांची कोरोना तपासणी केली असता दहा रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले. एक शिंगवे नाईक येथे रुग्ण सापडला. २१ पैकी ११ जण बाधित आढळून आले आहेत.
--
दोन घरातील रुग्ण कोरोनाबाधित सापडले आहे. तपासणी अजून चालू आहे. २१ पैकी ११ बाधित आले आहे. ही गंभीर बाब आहे, यांच्या संपर्कामध्ये असणाऱ्याची तपासणी करण्याचे बाकी आहे. बंदी असताना यात्रा भरली. अँटिजेन तपासणी केली आहे. उद्याही तपासणी करणार आहेत.
-कल्पना पोहरे,
आरोग्य अधिकारी, देहरे
--
ग्रामीण भागातील लग्न कार्यात मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. सरपंच ग्रामसेवक यांनी लग्नाला गर्दी होणार नाही, याची काळजी घ्यावी. गर्दीमुळे कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. प्रशासनाने दखल घेण्याची गरज आहे.
-रामदास भोर,
माजी सभापती, पंचायत समिती
--
गर्दी होऊ नये यासाठी आम्ही काळजी घेतली. ११ ते ५ या वेळेत सर्व दुकाने बंद होते. मात्र पाचनतंर अचानक लोकांची गर्दी झाली. गर्दी टाळण्याचे आवाहन केले. मात्र लोक ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते.
-बबन करांडे,
सरपंच, देहरे