शनी अमावस्येनिमित्त हजारो भाविक शनिचरणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2019 06:20 PM2019-05-04T18:20:50+5:302019-05-04T18:21:08+5:30
शनी अमावस्येनिमित्त शनिवारी (दि.४) शिंगणापूर येथे हजारो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले. पहाटे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, शनिभक्त राकेश कुमार (आॅस्ट्रेलिया), सौरव बोरा (मुंबई) यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
सोनई : शनी अमावस्येनिमित्त शनिवारी (दि.४) शिंगणापूर येथे हजारो भाविकांनी शनिदेवाचे दर्शन घेतले.
पहाटे ४.०३ वाजता अमावस्येला सुरुवात झाली असून रविवारी पहाटे ४.१५ पर्यंत अमावस्या असल्यामुळे आहे. त्यामुळे शनिवारी पहाटेपासून भाविकांची शिंगणापूर येथे शनी दर्शनासाठी गर्दी झाली. पहाटे औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे, शनिभक्त राकेश कुमार (आॅस्ट्रेलिया), सौरव बोरा (मुंबई) यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी राज्याच्या आदर्श गाव कृती समितीचे कार्याध्यक्ष पोपटराव पवार उपस्थित होते.
देवस्थानतर्फे पार्किंग व्यवस्था, आरोग्य, प्रसाद, पिण्याचे पाणी, माहिती सुविधा आदी सुविधा देण्यात येत आहे. भाविकांना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून चौथऱ्याजवळ मंडप उभारला असून, देवस्थानजवळील खाजगी जमिनीवर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली.
सूर्यपुत्र शनिदेव महाराज की जय, पवनपुत्र हनुमान की जय अशा जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमला होता. मंदिर व परिसरात आकर्षक सजावट करण्यात आली होती. शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी भाविकांचे शाल, श्रीफळ व शनी प्रतिमा देऊन सन्मान केला. रस्त्याच्या बाजूंना तेल, आरतीचे साहित्य, खेळणी दुकाने लावण्यात आली होती़
भाविकांसाठी मोफत अन्नदानाची व्यवस्थाही करण्यात आली होती. मंदिर परिसरात सुरु असलेल्या रक्तदान शिबीरात अनेक भाविकांनी रक्तदान केले. गर्दीवर सी.सी.टी.व्ही कॅमेरे लक्ष ठेवून होते. शेवगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जावळे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.