जामखेड तालुक्यात ११ हजार शेतक-यांना नुकसानीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 02:36 PM2019-11-17T14:36:32+5:302019-11-17T14:36:52+5:30
जामखेड तालुक्यातील नान्नज, नायगाव व जामखेड मंडलाला अवकाळीचा तडाखा बसला. काढणीसाठी आलेला कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्ष बागांचे नुकसान झाले.
अशोक निमोणकर ।
जामखेड : तालुक्यातील नान्नज, नायगाव व जामखेड मंडलाला अवकाळीचा तडाखा बसला. काढणीसाठी आलेला कांदा, सोयाबीन, कापूस, द्राक्ष बागांचे नुकसान झाले. नुकसानीच्या पंचनाम्यांचे काम पूर्ण झाले आहे. ११ हजार १२४ बाधित शेतक-यांच्या ५ हजार २१५ हेक्टर क्षेत्रात साडेआठ कोटी रूपयांचे नुकसान झाले आहे.
तालुक्यातील काही भागात ओला तर काही भागात कोरडा दुष्काळ आहे. जामखेड, नान्नज, नायगाव या मंडलात कांदा, सोयाबीन, कापूस पिकांचे अतिवृष्टीने नुकसान झाले आहे. पाण्यात भिजल्याने शेतात पुन्हा सोयाबीन पीक उगवून शेत हिरवीगार झाले आहेत. नान्नज परिसरात द्राक्ष बागा, कांदा, मका पिके उद्ध्वस्त झाले आहे. खरीप हंगामात ४२ हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड झाली होती. ९० दिवसात उडीद पिक थोड्याफार पावसात साधले जाते. यामुळे उडीदाची लागवड २९ हजार हेक्टर क्षेत्रावर झाली होती.
शेंगा भरण्याच्या अवस्थेत असताना पावसाने दडी मारल्याने उडीद पूर्ण वाया गेला. त्यामुळे बाजारपेठत उडदाला ४ हजार असणारा दर ९ हजारपर्यंत गेला. उडीद वाया गेला.
कृषी कार्यालयाने क्रॉपकटींग करून अहवाल दिला आहे. त्यामुळे शेतक-यांना लाभ होईल पण तो केव्हा मिळेल, याबाबत विमा कंपनीचे कार्यालय नसल्याने माहिती मिळत नाही. त्यामुळे परतीच्या पावसाने तालुक्यातील बाधीत क्षेत्र कमी झाले आहे.
नान्नजच्या उरेवस्ती येथे मागील २० वर्षापासून संतोष साधू मोहळकर व केशरबाई नामदेव मलंगनेर हे द्राक्ष फळबागांची लागवड करीत आहेत. यंदा अवकाळी पावसाने द्राक्षांची घडगळ झाली. त्यामुळे संपूर्ण द्राक्षबाग बाधित झाली, असे त्यांनी सांगितले.
सोयाबीनला कवडीमोल भाव
काढणीच्या वेळी झालेल्या पावसाने सोयाबीन काळे पडले आहे. बाजारपेठेत चांगल्या दर्जाच्या सोयाबीनला ३ हजार ८०० रूपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. मात्र केवळ काही दाणे काळे पडल्याने सोयाबीनला व्यापारी दोन हजार रूपये दर देत आहेत. पावसात भिजलेला माल साठवून ठेवल्यास तो किती दिवस टिकेल याची शाश्वती नसल्याने शेतकरी तो साठवण्याऐवजी मिळेल त्या किमतीला विकत आहेत.