कुकडीच्या भरोशावरील हजारो हेक्टर कांदा संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2021 04:19 AM2021-01-22T04:19:09+5:302021-01-22T04:19:09+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज व परिसरात कुकडीच्या पाण्याच्या भरोशावर शेतकऱ्यांनी हजारो हेक्टवर कांदा लागवड केली ...

Thousands of hectares of onions relying on chickens | कुकडीच्या भरोशावरील हजारो हेक्टर कांदा संकटात

कुकडीच्या भरोशावरील हजारो हेक्टर कांदा संकटात

लोकमत न्यूज नेटवर्क

निघोज : पारनेर तालुक्यातील निघोज व परिसरात कुकडीच्या पाण्याच्या भरोशावर शेतकऱ्यांनी हजारो हेक्टवर कांदा लागवड केली आहे. सध्या कुकडी पट्ट्यातील विहिरींची पाणी पातळी खालावली असून बंधाऱ्यांमधील पाण्यानेही तळ गाठला आहे. तसेच आवर्तनही उशीरा मिळणार असल्याने सुकू लागलेला कांदा व इतर पिके पाहून शेतकरी चिंतेत आहेत. पाणी लवकर सोडण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

निघोज परिसरातील कुकडीच्या पटट्यातील शेतकरी दरवर्षी मोठ्या प्रमाणावर कांदा लागवड करतात. कुकडीची आवर्तने वेळेत मिळत असल्याने कांद्याचे उत्पादनही चांगले मिळते. त्यामुळे वर्षानुवर्षे येथील शेतकरी रब्बी, उन्हाळ हंगामातील कांदा लागवड करतात. यंदा अगदी सुरवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला. त्यामुळे शेतकऱ्यांना कांद्याची रोपे साधलीच नाहीत. त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसला. त्यामुळे शेतकऱ्यांना बियाणासाठी हजारो रूपये खर्च करावा लागला. त्यानंतर कसेबसे आलेली रोपे लावण्यासाठीही एकरी आठ ते दहा हजार रूपये मजुरी द्यावी लागली. खुरपणी, खते हा खर्च तर वेगळाच. त्यातच आता विहिरी, कूपनलिकांची पाणी पातळी खालावल्याने कांदा, ऊस, डाळिंब व जनावरांचा चारा सुकू लागला आहे. त्यातच आवर्तन उशीरा येणार असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.

---------

..तर आंदोलन करणार

लोकप्रतिनिधी, कुकडी पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अधिकारी व प्रशासनाने येत्या चार ते पाच दिवसात पाणी सोडावे, अन्यथा रास्ता रोको करण्याचा इशारा शिवबा संघटनेचे अनिल शेटे यांनी दिला आहे. तसेच २०१८ मधील काही शेतकऱ्यांचा पीकविमा अद्यापही मिळालेला नाही, असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.

-----

पिके करपल्यावर मिळेल का पाणी?

१ फेब्रुवारीपासून कुकडीचे आवर्तन सुरू होणार आहे. ‘टेल टू हेड’च्या नियमानुसार हे आवर्तन सर्वप्रथम करमाळा, कर्जत, श्रीगोंदा आणि त्यानंतर पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांना मिळेल. कालव्याच्या ‘टेल’च्या भागात किमान महिनाभर पाणी चालेल. त्यानंतर म्हणजे १ मार्चनंतरच निघोज परिसराला पाणी मिळण्याची शक्यता आहे. म्हणजे आणखी सव्वा महिना जाईल. तोपर्यंत अनेक शेतकऱ्यांचा कांदा व इतर पिके पाण्याअभावी करपून जातील.

फोटोओळ : २१ निघोज ओनियन

निघोज परिसरात कुकडीच्या पाण्याच्या भरोशावर शेतकऱ्यांनी लागवड केलेला कांदा.

Web Title: Thousands of hectares of onions relying on chickens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.