ऑनलाइन सुविधांअभावी हजारो विद्यार्थी शिक्षणापासून वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:15 AM2021-06-17T04:15:46+5:302021-06-17T04:15:46+5:30
अहमदनगर : कोरोनाकाळात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने शिक्षण विभागाने ‘शाळा बंद, शिक्षण मात्र सुरू’ या ...
अहमदनगर : कोरोनाकाळात एकही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये या उद्देशाने शिक्षण विभागाने ‘शाळा बंद, शिक्षण मात्र सुरू’ या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना येनकेनप्रकारेण शिक्षण देण्याची धडपड केली. मात्र, काही शिक्षकांच्या इच्छाशक्तीअभावी जिल्ह्यात तब्बल ४० ते ५० हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिले. विशेष म्हणजे जिल्ह्यात शिक्षकांची संख्याच ३२ हजार एवढी मोठी असतानाही हे घडले आहे.
कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने शासनाने ऑनलाइन शिक्षण देण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यामुळे ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या व शहरी भागात महानगरपालिकेच्या, तसेच इतर सर्वच खासगी शाळांतील शिक्षक विद्यार्थ्यांना ऑनलाइन धडे देत होते. दुसरीकडे ऑनलाइन शिक्षणाची साधने नसल्यास संबंधित शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी ऑफलाइन शिक्षणाची सोय करावी, असे शासनाने म्हटले होते; परंतु याची अंमलबजावणी झाली नसल्याने ॲाक्टोबर २०२० या महिन्यात जिल्ह्यातील तब्बल ४२ हजार ७२८ विद्यार्थ्यांना शिक्षणापासून अलिप्त राहावे लागले. शिक्षण विभागाच्या अहवालातूनच ही आकडेवारी स्पष्ट झालेली आहे.
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून शिक्षकांना प्रथम ऑनलाइन शिक्षण सुरू ठेवण्याच्या अनुषंगाने कार्यरत राहायच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या; परंतु ग्रामीण भागातील हजारो विद्यार्थ्यांकडे ऑनलाइन शिक्षणासाठी आवश्यक असणारे मोबाइल, टीव्ही किंवा रेडिओ यापैकी कोणतेही साधन नाही. ही मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून त्यांना आठ-पंधरा दिवसांचा अभ्यास लिहून (हार्डकॉपी) द्यावा, विद्यार्थी-पालक यांच्यासोबत दूरध्वनीद्वारे संपर्क साधून त्यांना अभ्यासक्रम द्यावा, जमले तर स्वयंसेवक नेमून त्यांच्याकरवी अभ्यास द्यावा, हेही शक्य नसेल तर प्रत्यक्ष शाळेत जाऊन विद्यार्थ्यांच्या गट करून शिक्षण द्यावे, असे शिक्षण विभागाने शिक्षकांना स्पष्ट बजावले होते.
जिल्ह्यात जिल्हा परिषद शाळांचे ११ हजार ५२९, तर इतर व्यवस्थापन शाळांचे २० हजार ६२३, असे एकूण ३२ हजार १५२ शिक्षक आहेत. एवढे शिक्षक असतानाही तब्बल ४२ हजार विद्यार्थी शिक्षणापासून वंचित कसे राहिले, असा प्रश्न सर्वांनाच पडला आहे.
--------------
जिल्ह्यात शाळा आणि शिक्षक
प्राथमिक शाळा - ३५७३
शिक्षक - ११५२९
माध्यमिक व उच्च मा. शाळा - १८०३
शिक्षक - २०६२३
----------------
कोरोनाकाळात सर्व शिक्षकांनी कोरोना ड्यूटी करून ॲानलाइन अध्यापनाचे काम केले आहे. जेथे ॲानलाइन शिक्षणाच्या सुविधा मुलांकडे नव्हत्या, तेथे ऑफलाइन शिक्षणाची सोय करण्याच्या सूचना शिक्षकांना दिल्या होत्या.
- शिवाजी शिंदे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक
------------
कोरोनाकाळात शिक्षकांनी चांगले काम केले. सुरुवातीच्या काळात ॲानलाइन अभ्यासक्रम दिला, नंतर नोव्हेंबर २०२० मध्ये काही शाळा सुरू झाल्यानंतर शाळेत जाऊन अध्ययन केले. शिवाय शासनाने दिलेली कोरोना ड्यूटीही बजावली.
- रामदास हराळ, शिक्षणाधिकारी, माध्यमिक