गुणवत्ता यादीत आलेल्या उमेदवारालाच कारवाईची धमकी; अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्षांचा उफराटा न्याय
By सुधीर लंके | Published: April 21, 2020 01:14 PM2020-04-21T13:14:48+5:302020-04-21T13:15:00+5:30
विशाल बहिरम हा नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तरुण बँकेच्या भरतीत ज्युनिअर आॅफिसर या पदावर अनुसूचित जमाती प्रकल्पग्रस्त संवर्गात गुणवत्ता यादीत अव्वल आला होता. या उमेदवाराच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची नियुक्ती केली असल्याचे जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी स्पष्ट केले आहे.
अहमदनगर : आदिवासी उमेदवाराला जिल्हा सहकारी बँकेने नियुक्ती न दिल्याच्या प्रकरणाला ‘लोकमत’ने वाचा फोडल्यानंतर बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर यांनी या विषयावर अखेर खुलासा करत आम्ही या उमेदवाराच्या जागेवर प्रतीक्षा यादीतील उमेदवाराची नियुक्ती केली असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे विशाल बहिरम या उमेदवाराला गुणवत्ता यादीत येऊनही नोकरी मिळू शकत नाही, हे स्पष्ट झाले. याउलट बहिरम व संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस हे नाहक बँकेची बदनामी करत असून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा अध्यक्षांनी दिला आहे.
‘लोकमत’ने जिल्हा सहकारी बँकेच्या भरतीतील गैरप्रकारांवर प्रारंभीपासून प्रकाश टाकला असून सध्याही या प्रकरणाचा पाठपुरावा केवळ ‘लोकमत’कडून सुरु आहे. विशाल बहिरम हा नाशिक जिल्ह्यातील आदिवासी तरुण बँकेच्या भरतीत ज्युनिअर आॅफिसर या पदावर अनुसूचित जमाती प्रकल्पग्रस्त संवर्गात गुणवत्ता यादीत अव्वल आला होता. मात्र, आपणाला बँकेने नियुक्तीपत्रच पाठविले नाही, अशी तक्रार त्याने बँकेकडे गत १४ फेब्रुवारी रोजी केली होती. बहिरम याच्या तक्रारीची तपासणी सुरु आहे, असे बँकेचे प्रशासन ‘लोकमत’ला सांगत होते.
याबाबत गायकर यांनी सोमवारी प्रसिद्धी पत्रक काढले. त्यात त्यांनी म्हटले आहे, बहिरम याची तक्रार संयुक्तिक नाही. त्याला ३० एप्रिल २०१९ रोजी नाशिक येथील त्याच्या पत्त्यावर नियुक्ती पत्र पाठविले होते. मात्र पंधरा दिवसाच्या मुदतीत तो हजर झाला नाही. त्यामुळे प्रतीक्षा यादीतील अन्य उमेदवाराला नियुक्ती देण्यात आली आहे. आम्ही हे नियुक्ती पत्र पोस्टाने पाठविले होते, असे त्यांनी म्हटले आहे. मात्र, पोस्टाची पोहोच बँकेकडे आहे का? याचा काहीही उल्लेख या खुलाशात अध्यक्षांनी केलेला नाही.
दरम्यान, एक उमेदवार प्रथम श्रेणी अधिकारी पदावर निवडला गेल्यानंतर बँकेने त्याला हजर होण्यासाठी दहा महिन्यांची मुदतवाढ दिलेली आहे. बँकेचा हा निर्णयही वादग्रस्त ठरला आहे. याबाबत अध्यक्षांनी म्हटले आहे, ‘या उमेदवाराला ३ जून २०१९ रोजी नियुक्तीपत्र देण्यात आले होते. मात्र संबंधित उमेदवाराने बँकेत वेळोवेळी संपर्क करुन हजर होण्यास मुदतवाढ मागितली होती. ते पुणे जिल्हा बँकेत होते. तसेच त्यांना कर्जमाफीचे काम असल्याने ती बँक त्यांना मुक्त करत नव्हती. त्यामुळे त्यांना हजर होण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली.’ दरम्यान, यासंदर्भात बँकेने जो ठराव केला आहे, त्यामध्ये हा उमेदवार आजारपण व वैयक्तिक अडचणींमुळेही हजर झाला नाही, असे म्हटले
आहे.
बँकेने राबविलेली भरती प्रक्रिया नाबार्ड, सहकार विभाग यांच्या निकषांनुसार राबविलेली आहे. सहकार विभागाची चौकशी व न्यायालयाचा आदेश यानंतरच बँकेने ४६० उमेदवारांना नियुक्तीपत्रे दिली आहेत. तरीदेखील बहिरम तसेच टिळक भोस हे बँकेच्या हितास बाधा पोहोचवून प्रतिमा मलीन करत आहेत. भरतीत घोटाळा झाला असल्याचा गैरसमज पसरविला जात असल्याने कायदेशीर कारवाईचा इशाराही पत्रकात देण्यात आला आहे. भोस हे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष असून त्यांनी बँकेच्या भरतीबाबत सहकार विभागाकडे तक्रारी केलेल्या आहेत.
अध्यक्षांनी नियुक्तीपत्र पाठविल्याची पोहोच द्यावी - बहिरम
बँकेने जर आपणाला पोस्टाने नियुक्तीपत्र पाठविले तर त्याची पोहोच दाखवावी अशी आपली साधी मागणी आहे. बँकेची भरती अगोदर रद्द झाली व नंतर पुन्हा करण्यात आली. याबाबत बँकेने आपणाशी अधिकृतपणे काहीही संपर्क केलेला नाही. गुणवत्ता यादीत येऊनही आपणाला नियुक्तीपत्र आले नाही. जर ते पोस्टाने पाठविले आहे तर त्याची मला पोहोच तरी अध्यक्षांनी दाखवावी, असे या भरतीत गुणवत्ता यादीत आलेल्या विशाल बहिरम याने लोकमतशी बोलताना सांगितले.
अध्यक्षांनी आधी उत्तरे द्यावीत, मग खटले दाखल करावेत : भोस
जिल्हा बँकेच्या भरतीत अनियमितता झाली असून याबाबत ‘लोकमत’ने पुराव्यांसह सर्व बाबी समोर आणल्या आहेत. आपण भरतीबाबत सहकार आयुक्तांकडे रितसर तक्रार केली आहे. अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्या तालुक्यातील सर्वाधिक उमेदवार व पदाधिकाऱ्यांचे सगेसोयरेच भरतीत गुणवत्ता यादीत कसे आले? साध्या टपालाने उमेदवारांना नियुक्ती पत्रे का पाठवली? उत्तरपत्रिका तपासताना बँकेतील सीसीटीव्ही चित्रीकरण का बंद केले? परीक्षेतील संशयास्पद उत्तरपत्रिकांची फॉरेन्सिक तपासणी सरकारी एजन्सीकडून का केली गेली नाही? या प्रश्नांची उत्तरे मिळावीत ही संभाजी ब्रिगेडची रितसर मागणी आहे. यात काय बँकेची बदनामी केली? अण्णा हजारे यांनीही बँकेबाबत तक्रार केली आहे. त्यांच्यावरही अध्यक्ष बदनामीचा खटला भरणार आहेत का? बँकेची प्रतिमा टिकवायची असेल तर अध्यक्षांनीच वरील प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष टिळक भोस यांनी जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्ष गायकर यांच्या खुलाशावर प्रतिक्रिया देताना सांगितले.