फोटो व्हायरल करण्याची धमकी ; युवतीवर कॅफेमध्ये अत्याचार
By शेखर पानसरे | Published: June 22, 2023 06:58 PM2023-06-22T18:58:01+5:302023-06-22T18:58:33+5:30
१९ वर्षीय युवतीसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने तिच्यावर साडेचार वर्षात तिला वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर आले आहे.
संगमनेर : १९ वर्षीय युवतीसोबत काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तरुणाने तिच्यावर साडेचार वर्षात तिला वेळोवेळी अत्याचार केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पीडित युवतीने दिलेल्या फिर्यादीवरून गुरुवारी (दि. २२) संगमनेर शहर पोलिस ठाण्यात संगमनेर तालुक्यातील तरुणाविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
विनोद दत्तू गडकरी (रा. पेमगिरी, ता. संगमनेर), असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. २०१८ पासून ते १९ जून २०२३ पर्यंत अशी साडेचार वर्षे वेळोवेळी त्याने पेमगिरी शिवारातील ठाकरवाडी रस्त्यावरील डोंगरात आणि संगमनेर शहरापासून जवळच असलेल्या घुलेवाडी फाट्यावरील एका कॅफेमध्ये युवतीवर अत्याचार केले.
१९ वर्षीय युवतीसोबत गडकरी याने फोटो काढले होते. ते फोटो व्हायरल करण्याची धमकी तो तिला द्यायचा. त्याने तिच्यावर वारंवार अत्याचार केले. याबाबत कुठे तक्रार केल्यास मुलीला व तिच्या घरच्यांना जिवे मारण्याची धमकी तो द्यायचा. मुलगी अल्पवयीन असताना, तसेच ती सज्ञान झाल्यानंतर गडकरी याने तिच्यावर वेळोवेळी अत्याचार केले.
बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण कायदा २०१२ चे कलम ४, ८,१२ प्रमाणे, तसेच भादंवि ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेर तालुका पोलिस ठाण्याचे प्रभारी अधिकारी, परिवीक्षाधीन उपअधीक्षक शिरीष वामने, संगमनेर उपविभागाचे उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक इस्माईल शेख अधिक तपास करीत आहेत.