धमक्या आणि दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, बाळासाहेब थोरातांचा राधाकृष्ण विखे पाटलांना इशारा
By शेखर पानसरे | Published: March 19, 2023 06:55 PM2023-03-19T18:55:57+5:302023-03-19T19:02:59+5:30
'अचानक मिळालेल्या मंत्रीपदामुळे काही लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली आहे. अधिकारांचा वापर दंडेलशाही करण्यासाठी सुरू आहे. '
संगमनेर : अचानक मिळालेल्या मंत्रीपदामुळे काही लोकांच्या डोक्यात सत्तेची हवा गेलेली आहे. अधिकारांचा वापर दंडेलशाही करण्यासाठी सुरू आहे. आपल्या राजकीय सुडापोटी अहमदनगर जिल्ह्यातील विकासकामे आणि जनतेला वेठीस धरणाऱ्यांनी हे लक्षात ठेवावे, धमक्या आणि दादागिरी संगमनेरमध्ये चालणार नाही, आमच्या शांततेचा अंत बघू नका. अशी टीका माजी महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी महसूलमंत्री तथा अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर केली.
रविवारी (दि. १९) संगमनेरात आमदार थोरात यांनी पत्रकार परिषद घेत राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. मी १९८५ सालापासून सक्रिय राजकारणात आहे. आजवर अनेक पालकमंत्री बघितले. मात्र, पालकमंत्र्यांच्या परवानगीशिवाय कोणत्याही कामाचे भूमिपूजन किंवा उद्घाटन करायचे नाही. असा अजब फतवा काढणारे हे राज्यातले पहिलेच पालकमंत्री असावेत. पालकमंत्र्यांनी संगमनेरात जलजीवन मिशनच्या कामांची आढावा बैठक आयोजित केली होती.
२०१९ ते २०२२ या माझ्या कार्यकाळात मंजूर केलेली कामे बंद पाडणे हाच या बैठकीचा हेतू होता. संगमनेर तालुक्याची रचना, येथील राजकारण आणि कामांची पद्धती संपूर्ण राज्याला माहीत आहे. ज्यांना स्वतःच्या तालुक्यातले मुख्य रस्ते धड करता आले नाही, हे संगमनेरला येऊन बैठका घेतात आणि कामे बंद पाडतात हे हास्यास्पद आहे. पूर्वीपासूनच संगमनेर तालुक्याचा विकास त्यांच्या डोळ्यात खुपत आहे. त्यामुळे या विकासाला गालबोट कसे लावता येईल किंवा हा विकास कसा थांबवता येईल. हा त्यांनी संगमनेरात घेतलेल्या बैठकीचा प्राधान्यक्रम होता.