लोणी मावळा हत्याकांडात तीन आरोपी दोषी; मंगळवारी अंतिम निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2017 04:54 PM2017-11-06T16:54:07+5:302017-11-06T17:03:10+5:30

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणा-या तिघा आरोपींवर सोमवारी जिल्हा ...

Three accused in Loni Mawala murder case convicted; The final result on Tuesday | लोणी मावळा हत्याकांडात तीन आरोपी दोषी; मंगळवारी अंतिम निकाल

लोणी मावळा हत्याकांडात तीन आरोपी दोषी; मंगळवारी अंतिम निकाल

ठळक मुद्दे‘लोणी मावळा’चा घटनाक्रम२२ आॅगस्ट २०१४ रोजी तिघा आरोपींनी अल्पवयीन मुलीचा पाठलाग करून तिच्यावर अत्याचार करत खून केला.२३ आॅगस्ट २०१४ रोजी आरोपी संतोष लोणकर याला अटक२५ आॅगस्ट रोजी घटनेच्या चौथ्या दिवशी उर्वरित दोघा आरोपींना अटक१८ नोव्हेंबर २०१४ रोजी या प्रकरणी जिल्हा न्यायालयात दोषारोपपत्र दाखलडिसेंबर २०१४ रोजी या खटल्यासाठी अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती१ जुलै २०१५ रोजी न्यायालयात खटल्याच्या सुनावणीला प्रारंभ७ जुलै २०१७ खटल्याची सुनावणी पूर्ण

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिचा निर्घृण खून करणा-या तिघा आरोपींवर सोमवारी जिल्हा न्यायालयात दोष सिद्ध झाला. या खटल्याचा मंगळवारी निकाल देण्यात येणार आहे. संतोष विष्णू लोणकर (वय ३५), मंगेश दत्तात्रय लोणकर (वय ३०) व दत्तात्रय शिंदे (वय २७, रा. सर्व लोणी मावळा) असे दोष सिद्ध झालेल्या आरोपींची नावे आहेत.
निकाल देण्याआधी मंगळवारी न्यायालयात आरोपींच्या वतीने त्यांचे वकील अंतिम म्हणणे सादर करणार आहेत. जिल्हा व सत्र न्यायाधीश सुवर्णा केवले यांच्यासमोर लोणी मावळा खटला सुरू आहे. मंगळवारी न्यायालयाने आरोपींना समोर उभे करून तुम्ही तिघांनी लोणी मावळा येथील अल्पवयीन मुलीचा कट करून पाठलाग करत तिच्यावर अत्याचार करून खून केल्याचे सिद्ध झाले आहे. या आरोपासाठी फाशी अथवा जन्मठेप, अशी शिक्षेची तरतूद आहे, असे न्यायालयाने सांगत आरोपींना म्हणणे सादर करण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, यावेळी न्यायालयात सर्व आरोपींचे वकील उपस्थित नसल्याने आरोपींच्या वतीने मंगळवारी म्हणणे सादर करण्यात येणार आहे.
लोणी मावळा येथे २२ आॅगस्ट २०१४ रोजी संतोष लोणकर, मंगेश लोणकर व दत्तात्रय शिंदे याने शाळेतून घरी परतत असताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार करून तिचा खून केला होता. या घटनेनंतर दुस-या दिवशी संतोष याला पारनेर पोलिसांनी अटक केली होती़ त्यानंतर चार दिवसांनी उर्वरित दोघा आरोपींना अटक झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी १८ नोव्हेंबर २०१४ रोजी जिल्हा न्यायालयात आरोपींविरोधात दोषारोपपत्र दाखल केले़ सरकारी पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांनी खटला लढविला़ आरोपींच्या वतीने अ‍ॅड. अनिल अरोटे, अ‍ॅड. राहुल देशमुख, प्रीतेश खराटे व परिमळ फळे यांनी हा खटला लढविला.
या घटनेचा तपास पारनेर पोलीस ठाण्याचे तत्कालीन निरीक्षक शरद जांभळे यांनी केला होता़ लोणी मावळा येथील घटनेनंतर पारनेर तालुक्यासह जिल्ह्यात जनभावना तीव्र बनल्या होत्या. या खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने अ‍ॅड़ उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी, अशी मागणी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी राज्य सरकारकडे केली होती़ त्यानंतर सरकारने अ‍ॅड़ निकम यांची नियुक्ती केली होती.

सरकारी पक्षाने तपासले ३२ साक्षीदार

लोणी मावळा खटल्यात सरकारी पक्षाच्या वतीने एकूण ३२ साक्षीदार तपासण्यात आले़ या घटनेत प्रत्यक्ष साक्षीदार नव्हता; मात्र सरकारी पक्षाने न्यायालयात २४ परिस्थितीजन्य पुराव्यांची साखळी न्यायालयात सादर केली. या खटल्यात अ‍ॅड. निकम व अ‍ॅड. बाबासाहेब माळवे यांनी सहकार्य केले.

आरोपींवर सहा आरोप

अल्पवयीन मुलीचा खून करणा-या तिघा आरोपींवर दोषारोपपत्रात कट, कटानुसार पाठलाग करून अत्याचार, खून व बाललैंगिक अत्याचार, असे सहा आरोप ठेवण्यात आलेले आहेत. सदर अल्पवयीन मुलगी ही अळकुटी येथील विद्यालयात दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. आरोपींनी तिच्यावर अत्याचार व खून करून मृतदेह पिंपळगाव जोगा येथील कॅनॉलमध्ये फेकून दिला होता.

अण्णांकडून अ‍ॅड. निकम यांचे अभिनंदन
तिघा आरोपींवर न्यायालयात दोष सिद्ध झाल्याची माहिती मिळाल्यानंतर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी फोन करून अ‍ॅड. उज्ज्वल निकम यांचे अभिनंदन केले.

Web Title: Three accused in Loni Mawala murder case convicted; The final result on Tuesday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.