महिलेचे दागिने लुटणारे तीन आरोपी गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:19 AM2021-03-14T04:19:28+5:302021-03-14T04:19:28+5:30
कोपरगाव : महाशिवरात्रीनिमित्त महिला आपल्या घरात फराळ करीत असताना तीन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सहा ...
कोपरगाव : महाशिवरात्रीनिमित्त महिला आपल्या घरात फराळ करीत असताना तीन अज्ञात चोरट्यांनी घरात घुसून चाकूचा धाक दाखवून गळ्यातील सहा हजार रुपये किमतीचे मणी-मंगळसूत्र लुटून नेले. यावेळी तिच्या पतीला मारहाण करून जखमी करणाऱ्या तीनही आरोपींच्या पोलिसांनी चोवीस तासांच्या आत मुसक्या आवळून गजाआड केले. या लुटीतील मुद्देमालासह एक दुचाकी हस्तगत केली आहे.
कोपरगाव तालुक्यातील गोधेगाव येथे गुरुवारी रात्री ७.४५ वाजेच्या सुमारास ही घटना घडली होती. याप्रकरणी महिलेचे पती अशोक मारुती रांधवणे यांनी शुक्रवारी कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती. त्यावर पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत यंत्रणेमार्फत तपासाची सूत्रे हलविली असता यातील एक आरोपी हा गोधेगाव शिवारात संशयितरित्या लपलेला आढळला. पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता त्याचे नाव समाधान गोरख ठोंबरे (वय १९, रा. अंचलगाव, ता. कोपरगाव) असल्याचे निष्पन्न झाले. हा गुन्हा त्याने व त्याचे साथीदार ऋषिकेश शंकर पैठणकर व राजेंद्र लक्ष्मण जाधव (दोघे रा. टाकळी, ता. कोपरगाव) यांनी केला असल्याची पोलिसांना कबुली दिली. त्यानंतर पैठणकर व जाधव या दोघांना पोलिसांनी शिताफीने अटक करून गजाआड केले. अटेकतील तीनही आरोपींना शुक्रवारी कोपरगाव न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने सर्व आरोपींना १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. सदर कारवाई पोलीस निरीक्षक दौलत जाधव, उपनिरीक्षक सचिन इंगळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र म्हस्के, अंबादास वाघ, जयदीप गवारे यांच्या पथकाने केली आहे.