भाजपाच्या तिरंगा रॅलीत अपघात, आमदार मुरकुटेंसह तीन कार्यकर्ते किरकोळ जखमी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2019 01:58 PM2019-08-15T13:58:35+5:302019-08-15T14:05:06+5:30
खुपटीजवळ मोटारसायकल एकमेकांत अडकून पडल्याने आमदार मुरकुटे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.
नेवासा (जि. अहमदनगर) : स्वातंत्र्य दिनानिमित्त नेवासा तालुका भाजप युवा मोर्चाने आयोजित केलेल्या तिरंगा मोटारसायकल रॅलीमधील मोटार सायकली एकमेकांत अडकून अपघात झाला.यामध्ये आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्यासह तीन कार्यकर्ते किरकोळ जखमी झाले आहेत.
गुरुवारी सकाळी आमदार बाळासाहेब मुरकुटे यांच्या प्रमुख उपस्थितीत नेवासा ते श्री क्षेत्र देवगड दरम्यान ही मोटार सायकल रॅली आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार नेवासा येथील ज्ञानेश्वर मंदिरापासून रॅलीला सुरवात झाली होती. ही मोटारसायकल रॅली खुपटी, पानेगाव,सोनई,घोडेगाव,वडाळा,नेवासा फाटा मार्गाने जावून देवगड येथे समारोप होणार आहे.
दरम्यान, खुपटीजवळ मोटारसायकल एकमेकांत अडकून पडल्याने आमदार मुरकुटे यांच्या पायाला किरकोळ दुखापत झाली. तर भाजप युवा मोर्चाचे शहराध्यक्ष कृष्णा परदेशी, विलास बोरुडे, नाना शेंडे यांनाही किरकोळ दुखापत झाली असून त्यांना नेवासा फाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. उपचारानंतर आमदार मुरकुटे हे पुन्हा तिरंगा रॅलीमध्ये सहभागी झाले असल्याचे भाजपा तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे यांनी सांगितले.